((((लोगो ः आली दिवाळी)))
--
ABD26J82632 ((((फोटो ओळ)))
((((फोटो ओळ))) छत्रपती संभाजीनगर ः दिवाळी फराळासाठी चकल्या बनवताना महिला.
---
दिवाळीच्या फराळातून महिलांची आर्थिक भरारी
--
घरगुती व्यवसायाला बाजारपेठ ः अडीच हजारांहून अधिक महिला सक्रिय
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः दिवाळीच्या फराळाची चव आता केवळ घरापुरती राहिलेली नाही. बदलती जीवनशैली, वाढती धावपळ आणि तयार फराळाला मिळणारी पसंती यामुळे घरगुती फराळाच्या व्यवसायाला मोठी संधी मिळाली आहे. ऑनलाइन ऑर्डर, प्रदर्शनांतील स्टॉल आणि शहराबाहेरून मिळणाऱ्या मागणीमुळे महिलांच्या या व्यवसायाचा विस्तार होत असून, शहरातील अडीच हजारांहून अधिक महिला यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
शहरातील काही महिला घरगुती फराळ तयार करून पुणे, हैदराबाद, बंगळूरसह परदेशातही पाठवतात. स्वतःचा ब्रँड तयार करून त्यांनी बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना सणाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने, तयार फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. चवीसोबतच स्वच्छता, आकर्षक पॅकिंग, पदार्थांमधील वेगळेपणा आणि वेळेवर घरपोच सेवा यामुळे कमी भांडवलातून सुरू झालेला हा व्यवसाय अनेक महिलांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार बनत आहे.
---
बदलत्या आवडीनुसार फराळात नवे प्रयोग
पारंपरिक चकली, करंजी, अनारसे, लाडू आणि चिवडा यांची मागणी कायम असली, तरी ग्राहकांच्या आवडीनुसार फराळात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मिलेटपासून तयार केलेले पदार्थ, कमी साखरेचे लाडू, भाजलेले पदार्थ, वेगवेगळ्या चवींचा चिवडा आणि आकर्षक बॉक्स तयार केले जात आहेत. सणासुदीला नातेवाइकांना आणि मित्र परिवाराला भेट देण्यासाठी अशा पॅकिंगला मोठी पसंती मिळत आहे.
---
गुंतवणुकीपासून नफ्यापर्यंतचे गणित
फराळाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल, तेल, गॅस, मजुरी, पॅकिंग साहित्य आणि वाहतूक यासाठी गुंतवणूक करावी लागते. ऑर्डरनुसार उत्पादन केल्यामुळे माल शिल्लक राहण्याचा धोका कमी होतो. मात्र, पदार्थांचा दर्जा, चव आणि वेळेत वितरण याकडे लक्ष द्यावे लागते. दिवाळीच्या काळात मिळणाऱ्या ऑर्डरमधून महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. हा हंगामी व्यवसाय असला, तरी अनेक महिलांनी वर्षभर चालणाऱ्या गृहउद्योगाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
---
(((कोट)))
मी पंधरा वर्षांपासून फराळ आणि उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ तयार करते. वर्षाला माझ्या व्यवसायाची उलाढाल दहा लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात दिवाळीच्या फराळाची उलाढाल चार लाख होते. या प्रवासात संयम शिकायला मिळाला. कधी नुकसान झाले किंवा अडचण आली, तरी खचून न जाता पुन्हा नव्याने काम सुरू करण्याची ताकद सातत्य ठेवल्यामुळे मिळाली.
- मनीषा नाईक, गृहउद्योजिका
---
घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने मी फराळ बनवून गल्लीत विकण्यास सुरवात केली. वाळवणाचे पदार्थही तयार करू लागल्याने दोन वर्षांत चांगले पैसे मिळू लागले. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारू शकले. प्रत्येक महिला हा व्यवसाय करू शकते; फक्त तिने पहिले पाऊल टाकावे, संयम ठेवावा आणि कामात सातत्य ठेवावे.
- सारिका साळुंके, गृहउद्योजिका
--
आमचा बचत गट सात वर्षांपासून कार्यरत आहे. सुरवातीला केवळ पैसे जमा करत होतो. पण, फायदा होत नसल्याने पापड विक्रीसोबत फराळ आणि वाळवणाचे पदार्थ तयार करू लागलो. आज या व्यवसायातून आम्हाला चांगला नफा मिळत असून दहा महिलांना रोजगार देता येत आहे.
- राधिका राठोड, अन्नपूर्णा बचत गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.