बीडकरांनो, फराळाचा आस्वाद घ्या, पण आरोग्याची काळजी घ्या
खवट तेल आणि भेसळीला द्या फाटा; गृहिणी आणि हॉटेलचालकांसाठी खबरदारी गरजेची
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. २३ ः दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा आणि अर्थातच खमंग फराळाचा सण. बीड जिल्ह्यात परळीपासून आष्टीपर्यंत आणि माजलगावपासून केजपर्यंत सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. घराघरांत आणि बीडच्या बाजारपेठांमधील स्वीट मार्ट्समध्ये लाडू, चिवडा, चकलीचा खमंग दरवळ सुटला आहे. सणाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी फराळ अत्यंत महत्त्वाचा असला, तरी सध्याचे हवामानातील बदल आणि तेलकट-गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटाचे विकार बळावण्याची शक्यता असते. बीडकरांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी गृहिणी, हॉटेलचालक आणि नागरिकांनी काही महत्त्वाची काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील माता-भगिनी दिवाळीचा फराळ बनवताना प्रचंड मेहनत घेतात. मात्र, हा फराळ अधिक आरोग्यदायी होण्यासाठी पुढील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे:शुद्ध तेलाचा आग्रह: फराळ तळण्यासाठी नेहमी दर्जेदार, ताजे आणि उच्च प्रतीचे तेल किंवा तूप वापरा. जुने किंवा वारंवार तापवलेले तेल अजिबात वापरू नका.स्वच्छता आणि शुद्ध पाणी: बीड जिल्ह्याच्या काही भागात पाण्याचे स्रोत बदलत असतात. त्यामुळे फराळ बनवताना हात, भांडी आणि मळणीचे साहित्य पूर्णपणे स्वच्छ असावे. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी शुद्ध पाण्याचाच वापर करा.योग्य साठवणूक: चकली, चिवडा, लाडू हवाबंद डब्यात भरण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्या. सध्याच्या दमट आणि बदलत्या हवामानामुळे फराळाला बुरशी लागण्याची शक्यता असते. साहित्याचा दर्जा: बाजारातून बेसन, मैदा, रवा खरेदी करताना गुणवत्ता तपासा. जुनी, किडलेली किंवा भेसळयुक्त कडधान्ये वापरणे कटाक्षाने टाळा.
------
हॉटेलचालक व स्वीटमार्ट व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच तालुक्यातील मोठ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर फराळ विक्री होते. मैदा, वनस्पती तूप, खाद्यतेल आणि खवा अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका. कार्यक्षेत्रात आणि साठवणूक कक्षात झुरळे, मुंग्या व उंदीर यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्या. कामगारांना मास्क, हेड कॅप आणि स्वच्छ अॅप्रन वापरणे बंधनकारक करा. तयार मिठाई, विशेषतः खव्याचे पदार्थ आणि तळलेले जिन्नस योग्य तापमानावर साठवा. उघड्यावर ठेवलेले पदार्थ लवकर दूषित होतात. अन्न सुरक्षा मानकांनुसार व्यावसायिक उपयोगातील तेलाचे टीपीसी प्रमाण तपासा. तेल प्रमाणापेक्षा जास्त काळे किंवा जळलेले झाल्यास ते ताबडतोब नष्ट करा.
-----
अन्न विषबाधा टाळण्यासाठी ः
खवटपणाकडे लक्ष द्या: जास्त दिवस जुने झालेले तेलकट पदार्थ खवट लागतात. वास बदललेला फराळ खाणे टाळा, अन्यथा मळमळ, उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.
मर्यादित सेवन: मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी फराळाचे सेवन अगदी मोजक्याच प्रमाणात करावे.
पॅकिंग आणि लेबल्स तपासा: शक्यतो ताजे बनवलेले पदार्थ खाण्यावर भर द्या. रेडिमेड फराळ घेताना हवाबंद पाकिटावरील उत्पादनाची तारीख, एक्सपायरी आणि कोणते इन्ग्रेडिएंट्स वापरले आहेत, हे लेबलवर वाचूनच खरेदी करा.
-----
कोट
दिवाळीच्या काळात अति तेलकट आणि गोड पदार्थांचे सेवन केल्याने गॅस्ट्रो, ॲसिडिटी आणि अन्न विषबाधेचे रुग्ण वाढतात. बीडकरांनी घरगुती व ताज्या फराळाला प्राधान्य द्यावे. वारंवार तापवलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असते. मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आहारावर नियंत्रण ठेवावे. फराळ खाल्ल्यानंतर पोटदुखी, मळमळ किंवा जुलाबाचा त्रास जाणवल्यास अंगावर न काढता किंवा घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. श्रेयश देशपांडे, माजलगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.