पेशवाई, रजवाडी, ज्यूटच्या आकाशकंदिलांना मागणी
औरंगपुरा, शहागंज बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
छत्रपती संभाजीनगर, ता.२९ : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून, शहरातील प्रमुख बाजारपेठा कपडे, सजावटीचे साहित्य व विविध गृहोपयोगी साहित्याने सजल्या आहेत. औरंगपुरा आणि शहागंज परिसरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या असून, बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीसाठी बाजारात पेशवाई, रजवाडी आणि ज्यूटचे आकर्षक आकाशकंदील दाखल झाले आहेत. विविध प्रकारच्या लायटिंग्सचीही मोठी मागणी दिसून येत आहे.
दिवाळीच्या अनुषंगाने घराची सजावट व विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पणती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत, तर इलेक्ट्रिक दुकानांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक लायटिंग्स आणि नवीन दिव्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत विशेष करून आकाशकंदिलांमध्ये व्हरायटी बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेशवाई कंदील, रजवाडी कंदील आणि ज्यूटचे कंदील यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. या आकाशकंदिलांचे आकार फार मोठे नसले, तरी ते अत्यंत आकर्षक आहेत. याशिवाय, मेणबत्त्यांचे विविध प्रकार, दरवाज्यांसाठी नवीन डिझाइनचे तोरण आणि गॅलरीत लावण्यासाठी लहान आकाराचे आकर्षक आकाशकंदीलही बाजारात उपलब्ध आहेत.
-----------
किमतीत १० टक्के वाढ
कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आणि वाहतुकीचा खर्च अधिक झाल्यामुळे यंदा आकाशकंदिलांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी ग्राहकांच्या उत्साहात काहीही घट झालेली नाही. विशेष म्हणजे, काही स्थानिक बचत गटांच्या माध्यमातूनही आकाशकंदील तयार करून विक्रीसाठी आणले गेल्यामुळे अनेक महिलांना यातून चांगला रोजगार उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे
--------
‘‘सध्या बाजारात नवनवीन प्रकारचे आकाशकंदील आले असून, यामध्ये पेशवाई आणि रजवाडी कंदिलांना ग्राहकांची खूप चांगली मागणी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत किमती किंचित वाढल्या असल्या, तरी दर्जेदार माल विक्रीवर आमचा नेहमीच भर असतो. ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येत असल्याने बाजारात अतिशय सकारात्मक चित्र आहे.
- मिहीर पटेल, व्यावसायिक
---------
दिवाळी आली की घरात एक वेगळाच आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. बाजारात नवीन काय आले आहे, हे पाहण्यासाठी आज खरेदीला आले होते. पणती, लायटिंग्ससह आकाशकंदिलांचे वेगवेगळे प्रकार खूप आवडले. मी आज आकर्षक आकाशकंदील खरेदी केले असून, संपूर्ण बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.
- राधिका परोपकारी, गृहिणी
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.