OSM26B07358 धाराशिव ः येडशी येथे आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील.
----
चोराखळी, बारूळ, येडशीत घोंगडी बैठका
---
आमदार राणाजगजितसिंह यांची आदिवासींसह शेतकऱ्यांसोबत दिवाळी
---
धाराशिव, ता. ८ ः जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी जवळून समजून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी व बारूळ येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात दिवाळी फराळासोबत ‘घोंगडी बैठका’ घेतल्या. तसेच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
पाटील यांनी शेतकरी, युवकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी समस्या, चाराटंचाई आणि इतर अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. हा संवाद केवळ सणापुरता मर्यादित नसून, संकटाच्या प्रत्येक पावलावर शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा ठरला, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
------
येडशी येथे आदिवासी बांधवांसमवेत दिवाळीचा आनंद
मुख्य बाजारपेठांमधील रोषणाईपेक्षा गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हाच खरा आनंद असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर हजेरी लावली. लहानग्यांसह कष्टकरी कुटुंबीयांसोबत त्यांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला. जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांनी अशाच उपक्रमांतून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.