रुग्णालयातील तज्ज्ञांवर विश्वास ठेवा ः डॉ. भावना टाकळकर
----
डॉ. भावना टाकळकर या एक ज्येष्ठ आणि अनुभवी न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वर्ष १९९९ मध्ये सुश्रुत हॉस्पिटलमधून आपल्या वैद्यकीय कारकिर्दीला सुरवात केली. पुढे त्यांनी भावना न्यूरो सेंटरची स्थापना केली. रुग्णांना समर्पित असावे आणि ते डॉक्टरांनीच चालवावे, या ध्येयाने त्यांनी २००२ मध्ये आपल्या पतीच्या खंबीर पाठिंब्याने ॲपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. आजही त्या विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांना सोबत घेऊन रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत.
----
डॉक्टर हे देव नसून ते केवळ आपल्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आधारे रुग्णांना बरे करणारे माणूस आहेत, हे समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. भावना टाकळकर यांनी न्यूरोसर्जन आणि न्यूरोफिजिशियनमधील फरक, विमा कंपन्यांच्या निधीतील विलंब आणि मेंदूच्या आजारांबाबत सविस्तर माहिती दिली. रक्तदाब, मधुमेहाकडे होणारे दुर्लक्ष, तसेच रस्ते अपघातातील निष्काळजीपणा यामुळे होणाऱ्या दुखापती यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालय निवडताना लक्झरीपेक्षा तज्ज्ञ डॉक्टर आहेत का, हे पाहण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
----
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संघर्ष नाही. दोघेही आजाराविरुद्धच्या लढाईतील एकाच संघाचे सदस्य आहेत. आजार हा दोघांचाही समान शत्रू आहे. डॉक्टर हे देव नसून आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे रुग्णासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणारे माणूसच आहेत. हे समाजाने समजून घेतले पाहिजे, असे मत ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. भावना टाकळकर यांनी नोंदवले.
डॉ. टाकळकर म्हणाल्या, वर्ष १९९९ मध्ये सुश्रुत हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरवात केली. पुढे भावना न्यूरो सेंटरची स्थापना केली. त्यानंतर डॉक्टरांनी चालवलेले आणि रुग्णांसाठी समर्पित रुग्णालय ही संकल्पना घेऊन पुढे स्वतःचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक सहकाऱ्यांनी सोबत येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विविध कारणांमुळे ते शक्य झाले नाही. अशा वेळी पतीने खंबीर पाठिंबा दिला. पुढे विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर जोडले गेले आणि वर्ष २००२ मध्ये ॲपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले.
आजही अनेक रुग्णांना न्यूरोसर्जन आणि न्यूरोफिजिशियन यातील फरक समजावून सांगावा लागतो. वैद्यकीय क्षेत्रातील विशेषोपचारातील उपशाखांबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
विमा कंपन्यांकडून निधीचा विलंब, उपचार खर्च आणि दीर्घकालीन आयसीयू उपचारांची वास्तवता रुणांच्या नातेवाइकांनी समजून घ्यावी. रुग्णांनी आपल्या आजाराची माहिती करून घ्यावी, उपचारांच्या मर्यादा समजून घ्याव्यात आणि डॉक्टर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत का हे पाहावे, उपचारांचा परिणाम वेगळा विषय असला तरी प्रामाणिक प्रयत्न सर्वांत महत्त्वाचा असतो. मेंदूच्या सर्जरी संदर्भातील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसण्यात खूप अडचणी आहेत. त्यासाठी सर्जरी, आयसीयू, उपचार असे वेगवेगळे पॅकेज तयार केले तर अधिक रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकेल. सध्या मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळतो, अशी माहिती त्यांनी दिली.
मेंदूच्या आजारांबाबत बोलताना डॉ. टाकळकर यांनी रक्तदाब आणि मधुमेहाकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, दरवर्षी सुमारे ३० ते ४० ब्रेन हॅमरेजच्या शस्त्रक्रिया मी करते. त्यापैकी बहुतांश रुग्णांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवलेला नसतो किंवा औषधे नियमित घेतलेली नसतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांप्रमाणेच मेंदूच्या रक्तवाहिन्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ब्रेन स्ट्रोक केवळ वृद्धांनाच होतो, हा समज चुकीचा आहे. तरुणांमध्येही त्याची उदाहरणे आढळत आहे. नुकतेच एका २३ वर्षीय युवकावरही उपचार केले.
रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापतींचे प्रमाण गंभीर असल्याचे नमूद करताना त्यांनी हेल्मेट आणि सीट बेल्टच्या वापरावर भर दिला. हेल्मेट तपासणी टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेले रुग्ण आम्ही पाहतो. अनेकदा एका छोट्याशा निष्काळजीपणाची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळणे हीच सर्वांत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे, असे त्यांनी सांगितले.
मेंदूच्या दुखापतीनंतर रुग्णाला बरे होण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. त्यामुळे सुरवातीपासूनच नातेवाइकांची मानसिक तयारी करावी लागते. शिवाय उपचारानंतर सुधारणा झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट नव्या रुग्णांच्या नातेवाइकांशी घडवून आणली जाते. समान अनुभवातून मिळणारा विश्वास हा कोणत्याही समुपदेशनापेक्षा अधिक प्रभावी ठरतो, असे त्या म्हणाल्या.
न्यूरो सर्जरीमध्ये तंत्रज्ञानामुळे मोठी प्रगती झाली. सायबर नाइफ, गामा नाइफ, न्यूरो नेव्हिगेशनसारख्या तंत्रज्ञानामुळे काही ट्यूमरवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार शक्य झाले. उपचार अधिक अचूक आणि सुरक्षित होत असल्याचे डॉ. टाकळकर यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असला तरी, रुग्णांनी डॉक्टर आणि वैद्यकीय प्रक्रियेवर विश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. आजारी पडल्यावर भीती बाळगण्यापेक्षा योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरते. आज अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे मेंदूच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. भविष्यात आरोग्य विमा धोरणे अधिक सुलभ झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना अशा महागड्या उपचारांचा लाभ विनाअडथळा मिळू शकेल. तसेच, सरकारने लहान आणि मध्यम रुग्णालयांना आवश्यक ती मदत पुरवल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी ओळखून नियमित आरोग्य तपासणी करणे आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील हा विश्वासाचा सेतू जर असाच भक्कम राहिला, तर निश्चितच आपण एका निरोगी आणि सशक्त समाजाची यशस्वी उभारणी करू शकू.
-----
रुग्णालयातील लक्झरी नव्हे, तज्ज्ञ आहेत का ते पाहा
समाजाला मोठी कॉर्पोरेट रुग्णालये, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे आणि डॉक्टरांनी चालविलेल्या छोट्या रुग्णालयांची, नर्सिंग होम, क्लिनिकचीसुद्धा. रुग्णालय निवडताना आकर्षक, लक्झरी सुविधा नव्हे; तर त्या ठिकाणी आजारासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
----
वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची गरज
डॉ. टाकळकर म्हणाल्या, रुग्णालय चालविताना डॉक्टरांसोबतच कर्मचारी, औषधे, उपकरणे आणि इतर सेवांचा खर्च सातत्याने करावा लागतो. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडे सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची गरज आहे. याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित जीवनशैली, रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवणे आणि मेंदूला चालना देणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. मेंदुच्या आरोग्याबाबत सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.