दसरा-दिवाळीवर दुष्काळाचे सावट
----
पंचनामे सुरू, पण मदत कधी अन् किती?; शेतकरी हवालदिल
-----
केसरजवळगा, ता. ५ (बातमीदार) : वर्षभराचे कष्ट उपसून कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या बळिराजासमोर यंदा दुष्काळाचे संकट आले आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, या चिंतेने केसरजवळगा आणि परिसरातील शेतकऱ्यांना ग्रासले आहे. खरिपातील पिके पावसाअभावी करपून गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला, तर आता जमिनीत ओलावाच नसल्याने रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर, मूग आणि उडदाची पेरणी केली होती. मात्र, ऐन वाढीच्या काळातच पावसाने दडी मारली. परिणामी, खरिपातून अपेक्षित तर दूरच; पण केलेला खर्चही निघाला नाही. आता रब्बी हंगामासाठी जमिनीतील पाझर आटल्याने पेरण्या कशा करायच्या? असा प्रश्न आहे. खरिपापाठोपाठ रब्बीही हातातून जाण्याची भीती असल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.
----
पंचनाम्याचा सोहळा, मदतीचा मात्र संभ्रम
एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर यामुळे बळिराजाची आर्थिक घडी विस्कटली आहे. सध्या महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यांमुळे मदतीची काहीशी आशा निर्माण झाली असली, तरी मदत कधी जमा होणार?, हेक्टरी किती भरपाई मिळणार? याबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे.
-----
चारा व पाण्याचे दुहेरी संकट
केवळ पिकांचेच नव्हे, तर आगामी काळात पाऊस न पडल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व वाळलेल्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. एका बाजूला सण-उत्सवांचे दिवस, तर दुसऱ्या बाजूला जनावरांच्या छावण्यांची येणारी वेळ, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.