दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी
कालबद्ध आराखडा जाहीर करा
--
मराठवाडा पाणी परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः मराठवाड्याच्या पाणी आणि सिंचन प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दुष्काळमुक्त मराठवाड्याचा कालबद्ध कृती आराखडा गुरुवारी (ता. १७) जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास जल जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही परिषदेने दिला आहे.
निवेदनाचा आशय असा ः मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन ७८ वर्षे झाली. संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊनही या प्रदेशाचा सर्वांगीण विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर कायम आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २०२०-२१ च्या अहवालानुसार मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष सहा लाख १७ हजार हेक्टर आहे. त्यामुळे पाणी व सिंचनाचा प्रश्न हा या भागाच्या विकासातील सर्वांत गंभीर मुद्दा आहे. सततचा दुष्काळ, पावसावर अवलंबून असलेली शेती, अपुरे सिंचन, कालवे व वितरण व्यवस्थेची दयनीय अवस्था, धरणांमध्ये साचलेला गाळ, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीचे वाढते नुकसान, जळणाऱ्या फळबागा, बेरोजगारी, स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या समस्यांच्या मुळाशी पाण्याचा प्रश्न असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. नदीजोड प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा प्रकल्प, विदर्भातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविणे, समन्यायी पाणीवाटप, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, सिंचन अनुशेष दूर करणे तसेच कालवे व वितरण व्यवस्था सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे आणि उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांच्या सह्या आहेत.
-