दुष्काळामुळे सिमेंट रस्त्यांची कामे रद्द
-
६० कोटींची कामे बदलून भूजल पातळी वाढवण्याला प्राधान्य
हिंगोली, ता. १८ ः जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) यापूर्वी मंजूर करण्यात आलेली सिमेंट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सिमेंट रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे संभाव्य भीषण पाणीटंचाई लक्षात घेता रस्त्यांचा निधी आता थेट जलसंधारणाच्या कामांकडे वळविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. परिणामी, भूजल पातळी जवळपास तीन मीटरने खालावली असून विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. या गंभीर परिस्थितीत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करणे गरजेचे असल्याने अधिक पाणी लागणाऱ्या विकासकामांना चाप लावला जात आहे. त्यानुसार नियोजन समितीमार्फत प्रस्तावित सुमारे ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे बदलली जाणार आहेत. याउलट, मृद व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात ५० कामे मंजूर करण्यात आली असून, ६ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वर्ग केला आहे. आगामी काळात आणखी कामे प्रस्तावित झाल्यास मागणीनुसार जलसंधारणासाठी प्राधान्याने वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
चौकट
नैसर्गिक जलस्रोत बळकटीकरणावर भर
मृद व जलसंधारण विभागामार्फत नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण आणि साचलेला गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. विशेषतः पुराचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवर तत्काळ उपचार करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.