(लीड) ABD26J81736 खोराड सावंगी ः पावसाअभावी शेतशिवारातील कपाशी पिकाची झालेली अवस्था.
....................
एकरी नऊ क्विंटलचा कापूस केवळ तीन क्विंटल
दुष्काळाचा बसला फटका ः खर्च आणि उत्पन्नाचे गणित कोलमडले
खोराड सावंगी, ता. १९ : मंठा तालुक्यात यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आंभोरा जहागीर येथील शेतकरी नारायण आटोळे यांच्या शेतातील कापूस पीक सुकून गेले असून, यंदा एकरी अवघे दोन ते तीन क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणाऱ्या शेतात यंदा मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतातील कापसाची पाने वाळून गेली असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. कापसाला बोंडे लागली असली, तरी पिकाची अवस्था पाहता अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरण्याची वेळ आली आहे. आटोळे यांच्या शेतात दरवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळते. यंदा मात्र दुष्काळामुळे ते दोन ते तीन क्विंटलपर्यंतच राहण्याचा अंदाज आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, फवारणी आणि मजुरीसाठी मोठा खर्च झाला आहे. उत्पादनात मोठी घट होणार असल्याने हा खर्च भरून काढणेही कठीण झाले आहे. पिकाला जगविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर आता पर्याय उरलेला नाही. शिल्लक कापसाची वेचणी झाल्यानंतर सुकलेले पीक काढून टाकण्याची वेळ आटोळे यांच्यावर आली आहे. पुढील खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.यंदाच्या दुष्काळामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून, यंदाचा कापूस हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक संकटाचा ठरत आहे.
......
कोट
दरवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल कापूस होतो. मात्र, यंदा दुष्काळामुळे दोन ते तीन क्विंटलच उत्पादन होण्याचा अंदाज आहे. बियाणे, खते, फवारणी आणि मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. वेचणी झाल्यानंतर सुकलेले पीक काढून टाकावे लागणार आहे. शासनाने मदत करावी.
- नारायण आटोळे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.