जिल्हा दुष्काळात ‘दुसऱ्या ट्रिगर’च्या उंबरठ्यावर
‘महामदत’च्या तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया खोळंबली
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २१ ः जिल्ह्यात पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे दुष्काळाचा ‘पहिला ट्रिगर’ (पहिली कळ) आधीच लागू झाला आहे. आता प्रशासकीय निकषांनुसार जिल्हा ‘दुसऱ्या ट्रिगर’च्या (दुसरी कळ) उंबरठ्यावर पोचला असून, तो लागू झाल्यात जमा आहे. मात्र, राज्य सरकारच्या ‘महामदत’ पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जमिनीतील ओलावा (मृदा आर्द्रता) आणि भूजल पातळीची अधिकृत आकडेवारी मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेत तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे.
........
पावसाच्या खंडाने ‘पहिला ट्रिगर’ आधीच लागू
७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार, पर्जन्यमानातील तूट, पावसातील ३ ते ४ आठवड्यांचा खंड आणि जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी झालेला पाऊस या अनिवार्य निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यात पहिली कळ आधीच लागू झालेली आहे. जिल्ह्यात पावसाने मोठी हुलकावणी दिल्यामुळे ‘ट्रिगर-१’ची अट पूर्ण झाली असून, त्याआधारे पुढील तपासणी सुरू करण्यात आली आहे.
.........
((पॉईंटर))
‘दुसरा ट्रिगर’ लागू होण्याचे निकष काय?
२८ जून २०१८ च्या शासन निर्णयानुसार, दुष्काळ निश्चितीसाठी खालील चार प्रमुख प्रशासकीय निर्देशांक मानले जातात.
१. वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय)
२. लागवडीखालील क्षेत्र
३. मृदा आर्द्रता (साॅइल माॅईश्चर इंडेक्स-एमएआय)
४. जलविषयक परिस्थिती (ग्राउंड ड्राॅट इंडेक्स -जीडब्ल्यूडीआय)
या चारपैकी वाईट स्थिती दर्शवणारे तीन निर्देशांक विचारात घेतले जातात. जर दोन निर्देशांक ‘गंभीर’ व तिसरा ‘मध्यम’ वर्गवारीत आला, तर गंभीर दुष्काळ जाहीर होतो. तर कोणतेही दोन निर्देशांक किमान ‘मध्यम’ वर्गवारीत असल्यास मध्यम दुष्काळ सूचित होतो. धाराशिव जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती आणि विहिरींची खालावलेली पातळी पाहता जिल्हा दुसऱ्या ट्रिगरच्या निकषांत पूर्णपणे बसत आहे.
....................
‘महामदत’ पोर्टल बंद; स्थानिक पातळीवरून डेटा गोळा
दुसऱ्या ट्रिगरसाठी आवश्यक असणारी मृदा आर्द्रता आणि भूजल पातळीची माहिती ‘महामदत’ पोर्टलवरून आपोआप उपलब्ध होत असते. मात्र, सध्या हे पोर्टल बंद असल्यामुळे शासकीय पातळीवर अधिकृत नोंद होण्यास अडचण येत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांकडून उपलब्ध झालेला डेटा मिळविलेला आहे. मात्र, महामदतचा डेटा मिळाल्याशिवाय दुसरा ट्रिगर निश्चित करण्यात काहीशा अडचणी येत आहेत. मात्र, त्या दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
....................
((चौकट))
शेतकऱ्यांचे लक्ष निर्णयाकडे
पहिला ट्रिगर लागू झाल्यानंतर आता दुसऱ्या ट्रिगरची प्रशासकीय मोहर उठल्यास जिल्ह्यात अधिकृतपणे दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा होण्यास मदत होईल. यामुळे आवश्यक असलेल्या उपाययोजना, सवलती मिळण्यास सुरवात होईल. तसेच जमीन महसुलात सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि पिण्याच्या पाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना लागू करणे सरकारला बंधनकारक ठरेल. त्यामुळे ‘महामदत’चा डेटा कधी उपलब्ध होतो आणि शासन कधी निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
........
((कोट))
माॉइश्चर इंडेक्सची (मृदा आर्द्रता) माहिती जिल्हा स्तरावर थेट उपलब्ध नसते. ती उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. ‘महामदत’ पोर्टल बंद असले तरी आम्ही संबंधित विभागाला सूचित केले आहे. धाराशिव जिल्हा ट्रिगर-२ मध्ये बसत असून, महामदतचा अधिकृत डेटा मिळताच पुढील निश्चिती होईल.
- कीर्तिकिरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव
......
((कोट))
दुसरी कळ लागू होण्यासाठी लागणारा डेटा पोर्टलवर उपलब्ध नसल्याने मदत व पुनर्वसन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. असे असले तरी जिल्हा पातळीवरून संबंधित विभागांची माहिती मागवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची दुसरी कळ लागू होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
- विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.