((कात्रण ः ABD26J79207)))
---
तपासल्या १० हजार संचिका;
अहवालातून ‘सत्य’ उघड होणार?
---
‘सकाळ’च्या पाहुणचाराच्या वृत्तानंतर बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी
----
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १२) सार्वजनिक सुटीतही शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी संचिकांची ‘एसआयटी’च्या पथकाकडून विशेष तपासणी सुरू होती. ‘सकाळ’च्या पंचतारांकित पाहुणचाराच्या वृत्तानंतर बाहेरील कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात येऊ न देण्याचे फर्मानच अधिकाऱ्यांनी सोडले. शनिवारी दिवसभर बंद दाराआड संचिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीत छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, परभणी, जालना आणि बीड या पाच जिल्ह्यांतील १० हजार ४९ संचिकांची तपासणी या पथकाकडून केली जात होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर तसेच प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ही तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांतच हे काम पूर्ण करण्याचा पथकाचा प्रयत्न होता. मात्र, दोन दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत काम केल्यानंतरही माध्यमिकच्या काही संचिकांची तपासणी बाकी होती. प्राथमिक विभागाच्या संचिकांची तपासणी दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी माध्यमिकच्या संचिकांची तपासणी पूर्ण करून डॉ. पालकरांसह पथक रवाना झाले. तीन दिवस ठाण मांडून संचिका तपासताना आणि त्यावर स्वाक्षऱ्या करता करता अधिकाऱ्यांचे हातही आखडले होते.
---
दिवसभर बंद दाराआड तपासणी
पंचतारांकित पाहुणचारात पथकाने ही तपासणी पूर्ण केली. पथकाच्या या पाहुणचाराचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर, शनिवारी तपासणी सुरू असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मागील नवीन इमारतीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत न सोडण्याचे आदेश डॉ. महेश पालकर यांनी दिले. त्यामुळे दोन दिवस गजबजलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात शनिवारी शांतता होती. दिवसभर बंद दाराआड संचिका तपासण्यात आल्या.
---
अहवालातून सत्य समोर येईल?
विविध शिक्षण संस्थांमध्ये बनावट नियुक्त्या, नियमबाह्यपणे विनाअनुदानितवरून अनुदानितवर केलेल्या बदल्या, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरून शिक्षक पदावरील मान्यतेच्या तक्रारी आहेत. या तक्रारींच्या आधारे प्रत्यक्ष संचिकांची तपासणी करण्यासाठी हे पथक आले होते. मात्र, यापूर्वीही अशीच तपासणी करण्यात आली होती; त्यावर पुढे काय कारवाई झाली, हे समोर आले नाही. त्यामुळे आताच्या तपासणीनंतर अहवालातून तक्रारींतील सत्य समोर येईल की पूर्वीप्रमाणेच शिक्षण विभाग मूग गिळून गप्प राहील, असा प्रश्न जाणकार उपस्थित करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.