अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू करण्याची मागणी
अंबड, ता. ५ (बातमीदार) : अन्नसुरक्षेचे नियम केवळ हिंदू सणांनाच लागू न करता सर्व धर्मीयांसाठी समान पद्धतीने लागू करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे शुक्रवारी (ता. ४) करण्यात आली.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, या नियमांचे स्वागतच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मात्र, या संदर्भात केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदान यांचाच विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी तसेच कारवाईचा इशारा देणे ही भूमिका पक्षपाती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षेचे नियम आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा जात असा कोणताही भेद न करता सर्व धर्मीयांच्या अन्नदानासाठी समानपणे लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीमंतराव शेळके, डॉ. राजेंद्र भाला, रवींद्र अंबिलवादे, जगदीश जोशी, संजय देशमुख, गीताविलास खुंटेफळकर, बाबासाहेब वैराळ, संजय जगधने, कैलास शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.