दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
---
८२ हजार ०७४ विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा; जिल्ह्यातील शाळांना शुल्क न घेण्याचे निर्देश
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, या तालुक्यांसाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. याच निर्णयाअंतर्गत दुष्काळग्रस्त भागांतील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ८२ हजार ७४ विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात आला असून, कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील दहावीच्या ४७ हजार ५५५ व बारावीच्या ३४ हजार ५१९ अशा एकूण ८२ हजार ७४ विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यात लातूर तालुक्यातील सर्वाधिक अर्थात ३१ हजार २१४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उदगीर तालुक्यात ११ हजार ७०१, अहमदपूर तालुक्यातील आठ हजार ६२२, निलंगा तालुक्यात सात हजार ७९९, औसा तालुक्यात सात हजार ४१५, चाकूर तालुक्यात चार हजार ६९४, देवणी तालुक्यात तीन हजार १९५, जळकोट तालुक्यात तीन हजार १३४, रेणापूर तालुक्यात दोन हजार ६७० आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक हजार ६३० विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. ज्या संस्था परीक्षा शुल्क आकारत असतील, त्यांची माहिती शिक्षण विभागाला तातडीने कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.