(झळा दुष्काळाच्या )
.............
ऊस देयकांचा खोळंबा; शेतकरी आर्थिक कोंडीत
आश्वासन ३ हजारांहून अधिकचे; प्रत्यक्षात २,४०० ते २,८०० रुपये प्रतिटन दर
दिलीप गंभिरे
कळंब, ता. ८ : गेल्या ऊस गाळप हंगामात रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्यांनी ऊस जगविला. प्रसंगी लेकराबाळांच्या गरजा बाजूला ठेवून पिकासाठी पैसा खर्च केला. तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसाला तीन हजार ते तीन हजार १०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गाळप झाल्यानंतर अनेक कारखान्यांनी अपेक्षेपेक्षा कमी रक्कम अदा केली असून, उर्वरित देयकेही रखडविली आहेत. एकीकडे दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना दुसरीकडे थकीत ऊस देयकांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, तेरणा व वाशी कारखान्यांकडून सुमारे २ हजार ८०० रुपये, धाराशिव व हावरगाव येथील कारखान्यांकडून सुमारे २ हजार ७०० रुपये, तर इंदापूर येथील कारखान्याकडून २ हजार ४०० रुपये प्रतिटन दराने देयके अदा करण्यात आली आहेत. अपेक्षित दर आणि प्रत्यक्ष मिळालेल्या रकमेत मोठी तफावत राहिल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे. अनेक कारखान्यांकडून अद्याप कोट्यवधी रुपयांची ऊस देयके थकीत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.
कारखाने बदलले; जुन्या देयकांचे काय?
हावरगाव येथील डीडीएन शुगर युनिट क्रमांक दोन तसेच इंदापूर येथील भैरवनाथ शुगरप्रणित नरसिंह कारखान्याकडील थकीत ऊस देयकांचा प्रश्न अद्याप कायम आहे. खरीप हंगामासाठी कारखान्यांकडून जुन्या थकीत देयकांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. डीडीएन शुगर युनिट क्रमांक दोनचा ताबा ओंकार शुगरचे संस्थापक बाबूराव बोत्रे-पाटील यांनी घेतल्याने जुन्या थकीत देयकांचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. व्यवस्थापन बदलले असले तरी जुन्या देयकांची जबाबदारी कोणाची आणि शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे.
..................
((चौकट))
दुष्काळाने खरीप गेला; रब्बीची चिंता
कळंब तालुक्यात सुमारे १५ ते १६ लाख टन उसाचे उत्पादन होत असल्याने तालुक्याची ‘साखरेचा तालुका’ अशी ओळख आहे. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बीच्या पेरणीसाठीही शेतकऱ्यांकडे भांडवल उरलेले नाही. ऊस देयके वेळेत मिळाली असती तर रब्बी पेरणीसह शेतीचा पुढील खर्च भागविता आला असता. मात्र, महिनोन्महिने देयके रखडल्याने शेतकऱ्यांना कर्ज किंवा उधारीचा आधार घ्यावा लागणार आहे.
हावरगावच्या डीडीएन कारखान्याने सुमारे ३ लाख ७८ हजार टन, धाराशिव कारखान्याने ३ लाख २ हजार टन, तर ढोकी येथील भैरवनाथ (तेरणा) कारखान्याने ४ लाख ८१ हजार टन उसाचे गाळप केले आहे. कळंब तालुक्यातील गूळ, पावडर आदी कारखान्यांसह सुमारे १५ लाख टन उसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आश्वासित दर आणि एफआरपीप्रमाणे अनेक कोटी रुपयांची देयके अद्याप थकीत असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.