लातूर ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी केवश नेटके यांना देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
शेतकरी संघटना करणार
मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन
लातूर, ता. ३० ः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येऊनही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालेली नाही. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात मात्र आर्थिक संकटाचा अंधार आहे. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये जाहीर करून सरकारने एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनाचीच थट्टा केली आहे. म्हणून या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी मंगळवारी (ता. दहा) ‘तुमची दिवाळी, आमचा शिमगा'' हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, जनावरांना दावणीला चारा व पिण्याचे पाणी द्यावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रतिटन भाव द्यावा, महिला बचत गट व शेतमजुरांची सर्व प्रकारची कर्जे माफ करावीत, खाजगी सावकार व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा कर्जवसुलीचा छळ थांबवावा आणि घरगुती वीज ग्राहकांचे स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत, अशा मागण्या या संघटनेच्या आहेत.
त्यामुळे ता. दहा नोव्हेंबर रोजी शिरुर ताजबंद येथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर ‘तुमची दिवाळी आमचा शिमगा’ हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रूपेश शंके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याणाप्पा हुरदळे, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे,परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, धाराशिव जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधवर, बीड युवा जिल्हाध्यक्ष कैलास सोळंके, हिंगोली जिल्हाध्यक्ष देविप्रसाद ढोबळे, ज्येष्ठ नेते दगडूसाहेब पडीले, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, विश्वंभर भानुसे, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र सलगरे, निळकंठ बिराजदार, अण्णाराव चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.