((सेकंड लीड)
...........
फोटो क्रमांक
OSM26B06907, OSM26B06908, OSM26B06909
पावसाचा खंड, अळ्यांचा प्रादुर्भाव
उभी पिके करपू लागली; शेतकरी दुहेरी संकटात
गौर, ता. ५ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, दुसरीकडे विविध पिकांवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका यासह विविध खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके कोमेजून करपू लागली आहेत. पिकांच्या निर्णायक वाढीच्या काळातच पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
पावसाच्या खंडासोबतच विविध पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळ्या पिकांची पाने तसेच कोवळ्या भागांवर ताव मारत असल्याने नुकसान होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके व औषधांची फवारणी करावी लागत आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात औषधांच्या फवारणीचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.
खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. अनेकांनी कर्ज काढून अथवा उधारीवर शेतीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, आता पावसाचा खंड आणि अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळे अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पावसाच्या खंडामुळे तसेच अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी. तसेच कृषी विभागाने पिकांची पाहणी करून आवश्यक कीटकनाशके, तांत्रिक मार्गदर्शन व कृषी निविष्ठांबाबत मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.