दिवसा वीजपुरवठ्याचे आदेश कागदावर; शेतकऱ्यांचे ‘जागते रहो’
-----------
पिके वाचविण्यासाठी मध्यरात्री शेतात जाण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २१ ः पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिके संकटात आली आहेत. उपलब्ध विहीर, बोअर किंवा अन्य जलस्रोतांतील पाण्यावर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच, कृषिपंपांसाठी होणारा रात्रीचा वीजपुरवठा त्यांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना आजही मध्यरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात जवळपास तीन लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५० ते ८० हजार शेतकऱ्यांकडे सध्या विहीर, बोअर अथवा अन्य माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याचा अंदाज आहे. पावसाचा खंड वाढल्याने पिकांना संरक्षित सिंचनाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे हाताशी असलेले पाणी पिकांसाठी वापरण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, वीजपुरवठ्याचे वेळापत्रक या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा ठरत आहे. जिल्ह्यात कृषी वीजपुरवठ्यासाठी २५६ रोहित्रांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी जवळपास दीडशे रोहित्रांवर रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा होत असल्याची माहिती आहे. काही भागांत रात्री १२ वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत कृषिपंपांना वीज मिळते. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना याच वेळेत शेत गाठावे लागते. रात्रीच्या अंधारात मोटार सुरू करणे, पाइपलाइन तपासणे, पाण्याचा प्रवाह योग्य ठिकाणी वळविणे अशी कामे करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतात साप, विंचू तसेच अन्य वन्यजीवांचा वावर असल्याने जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पिके वाचवायची की जीव धोक्यात घालायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
---
पावसाचा खंड; प्रत्येक थेंब महत्त्वाचा
यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. पाऊस वेळेवर न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांमधील प्रत्येक थेंब पिकांसाठी वापरणे गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत दिवसा वीज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना सुरक्षितपणे सिंचन करता येऊ शकते. मात्र, अनेक भागांत अद्याप रात्रीच वीज मिळत असल्याने दिवसा वीज देण्याच्या शासनाच्या उद्देशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
---
२५९ मेगावॅटचे नियोजन, पण...
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून २५९ मेगावॅट वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. पण, आतापर्यंत सुमारे ९५ मेगावॅट क्षमतेचीच निर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे मर्यादित भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, उर्वरित शेतकऱ्यांना पारंपरिक वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकावर अवलंबून राहावे लागत आहे. पावसाचा खंड आणि खरीप पिकांची गरज लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करून अधिकाधिक कृषिपंपांना दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.