कर्जवसुलीचा तगादा लावाल, तर खैर नाही!
-----
उपनिबंधकांच्या रडारवर शेतकरी, शेतमजुरांना लक्ष्य करणाऱ्या फायनान्स कंपन्या
----------
सकाळ वृत्तसेवा
हिंगोली, ता. २८ : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेल्याने उत्पन्नाचे साधन हिरावले असताना, दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळे सक्तीची कर्ज वसुली थांबवा, असे शासनाने निर्देश आहेत. त्यामुळे असे फायनान्स आता जिल्हा उपनिबंधकाच्या रडारवर आहेत.
यंदा अत्यल्प पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला. सोयाबीन काढणीतून शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. तर, सध्या शेतात उभी असलेली हळद, कापूस, तूर पावसाअभावी करपून जात आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या डोईवर कर्जाचा बोजा वाढत चालला असून, अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शासनाने हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा नागनाथ या पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पण मायक्रो फायनान्स, काही खासगी बँकांकडून कर्जाच्या थकीत हप्त्यासाठी धमकाविणे, सक्तीच्या मार्गाचा अवलंब करणे, असे प्रकार सुरू आहेत.
----
‘काहीही करा, पण पैसे द्या’
वसमत तालुक्यातील अकोली येथे चार दिवसांपूर्वीच बंधन बँकेच्या वसमत शाखेचा कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला होता. त्यावेळी आर्थिक आणि मानसिक तणावत असलेल्या शेतकऱ्याने थेट मी फाशी घेईन, असे म्हटले. त्यावर फाशी घ्या, नाही तर आणखी काही करा; पण पैसे भरा, अशी भाषा त्या कर्मचाऱ्याने केली. असे प्रकार ग्रामीण भागात सुरूच असून, फायनान्सचे कर्मचारी थेट गावात येऊन वसुली करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फायनान्सकडून शासन निर्देश डावलून होत असलेली सक्तीची वसुली कर्जदार शेतकरी, शेतमजुरांसह गोरगरीबांसाठी त्रासदायक ठरत आहे.
------------------
दुष्काळात वसुलीचा दबाव
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अन्य कर्जांच्या वसुलीसाठीही सक्ती करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, काही मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जदारांना धमकावून वसुली करीत असल्याच्या, तसेच त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यावर आता कारवाईसाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
-------------
...तर ही बाब गंभीर
शासनाच्या निर्देशांना बगल देऊन सक्तीची वसुली केली जात असेल, तर ही बाब गंभीर असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठेही कर्जवसुलीसाठी धमकी, दबाव किंवा सक्तीचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिला आहे.
-----------
कर्ज वसुली अभिलेखे मागविले
दुष्काळी परिस्थितीतही कर्ज वसुलीसाठी सक्तीच्या मार्गाचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यात कार्यरत सर्व फायनान्सने कर्ज वसुलीबाबत अभिलेखे सादर करावेत, असे निर्देश बजावले आहेत. तसेच कंपनी कायद्याखालील नोंदणी प्रमाणपत्र, एनबीएफसी खालील नोंदणी प्रमाणपत्र किंवा प्राधिकरणाकडून महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत निर्गमित केलेले नोंदणी प्रमाणपत्रही तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
------------
((कोट))
यंदा अत्यल्प पावसामुळे पिके हातची गेली आहेत. अशा परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. दुसरीकडे मात्र कर्जाचा हप्ता थकलेला चालणार नाही, अशी सक्त ताकीद फायनान्स कंपन्याचे कर्मचारी देत आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून? हा प्रश्न आहे. दोन दिवसांपूर्वीच एका फायनान्सचा कर्मचारी वसुलीसाठी आला होता. किमान दुष्काळी परिस्थितीत तरी सक्तीची वसुली करू नये.
- पांडुरंग मानमोठे, शेतकरी
--------------------------
((कोट))
मागील दोन-चार वर्षांत ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सचे जाळे पसरले आहे. कर्ज वाटपासून फायनान्सचे कर्मचारी स्वत: घरी येतात, कमी व्याजदराचे आमिष दाखवितात; परंतु एकदा का कर्ज घेतले की त्यांचेच नियम लादतात. आर्थिक संकटामुळे कर्ज घ्यावे लागते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देणे गरजेचे आहे.
- गजानन बंदुके, किराणा व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.