सण-उत्सवाच्या काळात दीड हजार
किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
- तुळजापूर, येरमाळा, रामकुंड येथे ‘एफडीए’ची कारवाई
- नऊ लाख ४४ हजार रुपयांचा गुटखाही जप्त, तीन गुन्हे दाखल
.......
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २७ ः दसरा आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व शुद्ध अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील तुळजापूर, रामकुंड (ता. भूम) आणि येरमाळा (ता. कळंब) परिसरातील १६ अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत तब्बल १ हजार ५१० किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
१२७७ किलो खव्यासह मिठाई जप्त
सण-उत्सवांच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते, याचाच गैरफायदा घेऊन भेसळयुक्त पदार्थ विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता एफडीएच्या चार सदस्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या साठ्यामध्ये प्रामुख्याने १,२७७ किलो खव्यासह गुळ, तूप, पेढे आणि कलाकंदचा समावेश आहे. या १६ ठिकाणांवरून अन्नपदार्थांचे प्रत्येकी एक असे एकूण १६ नमुने ताब्यात घेण्यात आले असून, ते अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; विक्रेत्यांनी अन्न सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
९ लाख ४४ हजारांचा गुटखा जप्त
अन्नपदार्थांवरील कारवाईसोबतच एफडीएने अवैध आणि आरोग्यास घातक असणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याविरोधातही आपला मोर्चा वळवला आहे. उमरगा येथे दोन आणि धाराशिव शहरात एका ठिकाणी ठिकाणी छापे मारून ९ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान गुटख्याची वाहतूक करणारे ७ लाख रुपये किमतीचे एक वाहनदेखील जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.