फोकस
--
कलेचा वारसा जपणारेच मानधनाच्या प्रतीक्षेत
---
(ABD26J82801)
दिव्या तौर, ८७६६४८८७८३
आयुष्याची अनेक वर्षे लोककला, भजन, कीर्तन, नाटक, गायन आणि साहित्याच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यात घालवायचे. कलेच्या माध्यमातून समाजाला आनंद देणाऱ्या कलाकारांच्या वाट्याला मात्र उतारवयात आर्थिक विवंचना येत आहे. वय सरत आहे, पूर्वीसारखे कार्यक्रम करणे शक्य होत नाही, उत्पन्नाचे साधनही कमी होत आहे. अशा वेळी जगण्याला आर्थिक आधार मिळावा, ही त्यांची अपेक्षा. मात्र, शासनाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठीही त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अर्ज, कागदपत्रांची पूर्तता आणि निवड प्रक्रियेच्या फेऱ्यांतच अनेक कलाकार अडकले आहेत. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्यांना हक्काच्या मानधनासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणे, ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नाही, तर कलाकारांच्या जगण्याशी निगडित गंभीर प्रश्न आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा ही आर्थिकदृष्ट्या गरजू कलाकारांसाठी उतारवयातील महत्त्वाचा आधार आहे. नियमित उत्पन्नाचे साधन नसलेल्या कलाकारांना या मानधनातून औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होऊ शकते. मात्र, योजनेसाठी अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया कधी पूर्ण होणार, मानधन कधी सुरू होणार, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याची कलाकारांची तक्रार आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही निवडीची प्रतीक्षा कायम असल्याने योजनेचा उद्देश आणि प्रत्यक्ष लाभ यातील दरी अधोरेखित होत आहे. शेतकऱ्याला कधी निसर्गाचा फटका बसतो, तर कधी बाजारभावाची चिंता सतावते. कलाकारांचे आयुष्यही अशाच अनिश्चिततेत गेलेले असते. कार्यक्रम मिळतीलच याची खात्री नसते. मिळालेल्या मोबदल्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यभर कलेच्या जोरावर जगणाऱ्या या कलाकारांना उतारवयात मात्र आर्थिक आधाराची नितांत गरज असते. ज्या वयात त्यांना समाजाकडून सन्मान आणि शासनाकडून आधार मिळायला हवा, त्याच वयात मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही व्यवस्थेतील विसंगती आहे.
अनेक कलाकारांकडे उत्पन्नाचे नियमित साधन नाही. वयोमानामुळे पूर्वीसारखे कार्यक्रम करणे शक्य होत नाही. औषधोपचार, घरखर्च आणि इतर गरजांसाठी त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मानधनासाठी वारंवार कार्यालयात जाणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि अर्जाच्या स्थितीची माहिती मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे ठरते. काही कलाकारांना कागदपत्रांच्या पूर्ततेत अडचणी येतात, तर काहींना अर्जांवरील पुढील कार्यवाहीची माहितीही मिळत नाही. परिणामी, ज्यांच्यासाठी योजना आहे, त्यांनाच तिचा लाभ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
कलाकारांच्या सन्मानाची भाषा करणे आणि त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविणे यात मोठा फरक आहे. केवळ योजना जाहीर करणे किंवा अर्ज मागविणे पुरेसे नाही. पात्र कलाकारांची निवड वेळेत होणे आणि त्यांच्या खात्यात मानधन नियमित सुरू होणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रलंबित अर्जांची तातडीने छाननी, कागदपत्रांतील त्रुटींची स्पष्ट माहिती, अर्जांच्या सद्यःस्थितीची उपलब्धता आणि निवडीचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची गरज आहे.
आयुष्यभर कलेच्या माध्यमातून समाजाचे सांस्कृतिक विश्व समृद्ध करणाऱ्या कलाकारांना उतारवयात आर्थिक आधारासाठी संघर्ष करावा लागणे, ही व्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. कलाकारांचा गौरव सोहळे आणि पुरस्कारांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या जगण्याला आधार देणारा असायला हवा. पात्र कलाकारांची निवड वेळेत करून मानधन सुरू करणे, ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, कलाकारांच्या सन्मानाच्या योजना केवळ कागदावरच राहतील. ज्यांनी आयुष्यभर कलेची ज्योत तेवत ठेवली, त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्याचा दिवा कधी लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.