इन्फोग्राफिक्स....
---------------------
दिवाळीत फटाके फोडताना
डोळ्यांची घ्यावी काळजी
-----------------------
-निष्काळजीपणा ठरू शकतो धोकादायक
-नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेने केले आवाहन
----------------------------
दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रकाशाचा सण असला; तरी फटाके फोडताना थोडीदेखील निष्काळजीपणाची भूमिका गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकते. विशेषतः फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या दुखापतींचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन परभणी नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
दिवाळीत फटाक्यांच्या ठिणग्या, उडणारे तुकडे, तीव्र उष्णतेमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. काही प्रकरणांत डोळ्यांची दृष्टी कायमची जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवणे, फटाक्यांच्या अगदी जवळ उभे राहून आतषबाजी न पाहणे आणि शक्यतो सार्वजनिक ठिकाणी आयोजित सुरक्षित आतषबाजीचा आनंद घेणे आवश्यक आहे. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनी योग्य दर्जाचा संरक्षक चष्मा वापरावा. केवळ नंबरचा चष्मा किंवा सनग्लासेस फटाक्यांच्या ठिणग्या, उडणाऱ्या तुकड्यांपासून पुरेसे संरक्षण देऊ शकत नाहीत.
((चौकट)))
लहान मुलांना फटाके देणे टाळावे
लहान मुलांना फटाके देणे टाळावे. फुलबाज्यांसारखे फटाकेही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यातील उष्णतेमुळे भाजण्याच्या घटना घडू शकतात. मोठ्या मुलांना फटाके फोडू देताना प्रौढ व्यक्तींची देखरेख असणे गरजेचे आहे. न फुटलेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांच्याजवळ जाऊन हाताळू नये. अशा फटाक्यांना सुरक्षित अंतरावरून पाणी टाकून निष्क्रिय करावे. फटाके मोकळ्या जागेत, इमारती, वाहने, झाडे आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर फोडावेत.
((चौकट)))
वाकून फटाके फोडणे धोकादायक
फटाक्यांवर वाकून उभे राहणे, हातात धरून फटाके फोडणे तसेच काचेच्या किंवा धातूच्या डब्यात फटाके पेटवणे टाळावे. फटाके फोडण्याच्या ठिकाणी पाणी किंवा वाळूची बादली ठेवावी. एका वेळी एकच फटाका पेटवावा. त्यासाठी अगरबत्ती किंवा लांब काडीचा वापर करावा. फटाके फोडताना धावपळ, ढकलाढकली, मस्करी करू नये.
---
धूर, आवाज आरोग्यासाठी घातक
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम केवळ डोळ्यांपुरते मर्यादित नसतात. फटाक्यांच्या धुरातील सूक्ष्म कण, रासायनिक घटकांमुळे वायुप्रदूषण वाढते. यामुळे खोकला, घशाची जळजळ, दम्याचा त्रास आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होणे, कानात सतत आवाज येणे किंवा कानाच्या पडद्याला इजा होणे असे प्रकार घडू शकतात. हात, चेहरा, शरीराच्या इतर भागांना भाजणे, जखमा होणे व आग लागण्याचे अपघातही संभवतात.
---
((कोट)))
दिवाळीचा खरा आनंद कुटुंबीय आणि समाजाच्या सुरक्षिततेत आहे. डोळ्यांची दृष्टी ही अमूल्य संपत्ती असून एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या दिवाळीत फटाक्यांपेक्षा दिव्यांना प्राधान्य द्यावे, सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी. सुरक्षित दिवाळी, निरोगी दिवाळी साजरी करावी.
- डॉ. संजय टाकळकर,
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, परभणी
(संकलन ः गणेश पांडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.