पान ४ अँकर
-----
पशुधनाला संजीवनी; जिल्ह्यात चारा बियाण्यांचे युद्धपातळीवर वाटप
जनावरांचा चारा प्रश्न मिटणार; जिल्ह्यात २६४ क्विंटल नव्याने वितरण; २८०० शेतकऱ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १६ : यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने केवळ माणसांच्याच नव्हे, तर मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला दुग्धव्यवसाय आणि पशुधन वाचवणे हे सध्या शेतकऱ्यांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. या संकटाच्या काळात पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आणि पशुधनाचे संवर्धन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ठोस पावले उचलली असून, जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप युद्धपातळीवर सुरू केले आहे. दर्जेदार आणि सुधारित चारा बियाण्यांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून बीड जिल्ह्यासाठी एकूण ६८० क्विंटल वैरण बियाणे मंजूर झाले असून, पशुसंवर्धन विभागाने चारा नियोजनाला गती दिली आहे. आतापर्यंत २ हजार ८०० गरजू पशुपालकांना ३३९ क्विंटल बियाण्यांचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विदर्भ-मराठवाडा विकास योजनेच्या माध्यमातूनही १३९ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ''एनएमएच-४०५३'' या अत्यंत दर्जेदार आणि सुधारित मका वाणाचा समावेश आहे. मुख्यालयात प्राप्त झालेले बियाणे तात्काळ गावपातळीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे स्पष्ट आदेश पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ऐन दुष्काळात शासनाने ही मदत उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची चिंता थोडी कमी झाली असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून चारा लागवड करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
----
तालुकानिहाय बियाणे वाटपाचे नियोजन
नव्याने प्राप्त झालेल्या २६ हजार ४०० किलो (२६४ क्विंटल) मका बियाण्याचे जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत वितरण सुरू झाले आहे. दुष्काळी झळा सर्वाधिक सोसणाऱ्या आष्टी तालुक्याला सर्वाधिक ४,००० किलो बियाणे देण्यात आले आहे. याशिवाय बीड, केज, गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांसाठी प्रत्येकी ३,००० किलो, अंबाजोगाई आणि पाटोदासाठी प्रत्येकी २,००० किलो, शिरूर कासारसाठी १,४०० किलो, तर धारूर व वडवणी तालुक्यांसाठी प्रत्येकी १,००० किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे.
----
बियाणे मिळाले, पण पाण्याचे काय?
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून चारा टंचाईवर मात करण्यासाठी बियाण्यांचे वाटप वेगाने होत असले तरी, शेतकऱ्यांसमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा आहे. विहिरी कोरड्या पडल्याने, पेरलेल्या या चारा पिकाला पाणी कुठून आणि कसे द्यायचे? दुग्धव्यवसाय हाच दुष्काळात जगण्याचा मुख्य आधार असल्याने, जनावरे जगवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
----
कोट
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात चारा बियाणे वाटपाची मोहीम अविरत सुरू आहे. आतापर्यंत ३३९ क्विंटल चारा बियाणे वितरित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी थोडेफार पाणी, लागवडीयोग्य जमीन आणि जनावरे उपलब्ध आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन त्वरित अर्ज करावा.
- डॉ. तोळाराम राठोड, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, बीड