crime news Esakal
छत्रपती संभाजीनगर

व्याजाने दिलेल्या एक लाखासाठी बहीण रक्ताचे नातेही विसरली; गुंडांकरवी भावाला संपविले!

पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, ११ जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या लग्नासाठी भावाला व्याजाने एक लाख रुपये दिले खरे; पण याच पैशांसाठी बहिणीने सख्ख्या भावाचा गुंडांच्या मदतीने खून केला. ही घटना १ नोव्हेंबररोजी बेगमपुरा भागात समोर आली होती. विशेष म्हणजे, आत्महत्या केल्याचा बनावही केला. मात्र, घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मृत भावाला झालेल्या जखमा आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बेगमपुरा पोलिसांना ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा अहवाल दिला.

त्यानंतर या प्रकरणात बहिणीसह तिचा दूरचा नातेवाईक, त्याचे मित्र अशा पाचहून अधिक जणांविरोधात २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, ही घटना समोर आली तेव्हा बहीणच गायब होती, त्यामुळे तत्काळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल ११ जणांना ताब्यात घेतले.

जगदीश ज्योतिष फत्तेलष्कर (वय ४०, लालमंडी, बेगमपुरा) असे मृत भावाचे नाव आहे. तर रीना राजेश यादव (कुटलेवाले), रितेश रामलाल मंडले ऊर्फ यादव (रा. दोघेही लालमंडी, बेगमपुरा मूळ रा. अकोट, जि. अकोला) रितेशची आई आरोपी रमाबाई रामलाल मंडले (रा. अकोट), लखन, गोलू यांच्यासह इतर अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मृत जगदीश यांच्या पत्नी किरण फत्तेलष्कर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. मृत जगदीश यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी जगदीश यांनी मुलीच्या लग्नासाठी आरोपी बहीण रीनाकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.

मागील काही दिवसांपासून रीना पैशांसाठी तगादा लावत होती, महिन्याभरापूर्वी तर तिने चक्क घरात कब्जा केला होता. ती एका नात्यातील दूरच्या तरुणासह त्याच्या मित्रांना घेऊन ३१ ऑक्टोबररोजी सकाळी १० दरम्यान फिर्यादीच्या घरी पैशांसाठी आली होती. तिने शिवीगाळ करत डोळ्यात चटणी टाकून मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर पैशांबाबत समझोता झाल्यानंतर ते गेले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी १ नोव्हेंबर रोजी आरोपी रीना ही पुन्हा त्याच लोकांसोबत कार आणि बुलेटने (एमएच ३०, बीटी १००८) घरी आली. त्यावेळी भांडण करत असताना जगदीश यांच्या कुटुंबीयांनी ‘आमची रजिस्ट्री होऊ द्या, तुमचे पैसे देऊन टाकू’ असे म्हटल्यानंतरही आरोपी बहिणीने इतरांच्या मदतीने जगदीश यांच्यासह कुटुंबीयांना मारहाण करत जगदीश यांना कारमध्ये घेऊन गेले. त्यानंतर दुपारी चारदरम्यान त्यांचा मृतदेह मकाईगेटजवळील खामनदीच्या पुलाखाली आढळून आला होता.

पोलिसांच्या संख्येपेक्षा आरोपी जास्त

बेगमपुरा ठाण्याचे एक पथक अकोला जिल्ह्यात आरोपींच्या शोधासाठी गेले. पथकासोबत केवळ एक महिला कॉन्स्टेबल गेल्या होत्‍या मात्र तिथे गेल्यानंतर आरोपींची संख्या जास्त असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल ११ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांपेक्षा आरोपींची संख्या जास्त असल्याने पोलिसांनाही धाक पडला होता, मात्र ऐनवेळी स्थानिक पोलिसांनी मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

रातोरात गेली पळून

आरोपी रीना ही शहरातच राहते, मात्र खून केल्यानंतर सर्व आरोपींसोबत ती अकोट (जि. अकोला) येथे पळून गेली. ती फरार झाल्याने पोलिसांनाही तिच्यावर संशय आला होता, तसेच मृत जगदीश यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता,

तसेच त्यांच्या मणक्याला, इतर ठिकाणी जखमा आढळून आल्या होत्या, विशेष म्हणजे डॉक्टरांनी जखमा बघितल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून ही आत्महत्या नव्हे तर खूनच असल्याचा अहवाल दिला त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे करत आहेत.

बारा दिवसांवर आलेली भाऊबीजही विसरली!

बहीण भावांतील नाते दृढ करणारा सण म्हणजे राखीपौर्णिमा अन् दिवाळी भाऊबीज. मात्र नेमके राखी पौर्णिमेच्या सणालाही तिने भावासोबत भांडण केले होते! इतकेच नव्हे तर दिवाळी भाऊबीजेला ज्या हातांनी भावाला ओवाळायचे,

त्याचे औक्षण करायचे त्याच हातांनी भावासह त्याच्या पत्नीला तिने मारहाण केली. शिवाय चक्क आईलाही तिने धक्काबुक्की केली. तिला भाऊबीजेची आठवणही का आली नाही, असे म्हणत स्मशानभूमीत मृत जगदीशच्या नातेवाइकांनी टाहो फोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT