मूलभूत सुविधा १५ दिवसांत पूर्ववत करा
- ‘सकाळ’च्या दणक्यानंतर पुरवठा विभाग अॅक्शन मोडवर
- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पेट्रोल पंप तपासणीसाठी पथके
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ : जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि अनास्थेचा कारभार ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष मालिकेतून चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुरवठा विभाग अखेर अॅक्शन मोडमध्ये आला असून, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पंधरा दिवसांत सर्व सक्तीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. मुदतीत अंमलबजावणी न झाल्यास पेट्रोलियम कायदा-२००२ नुसार कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
पेट्रोल पंपावरील सुविधांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी पुजार यांनी संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृह कुलूपबंद ठेवणे, ते नादुरुस्त असणे, अपुरी पाणी साठवणूक, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसणे, मोफत हवा भरण्याची मशीन बंद किंवा नादुरुस्त असणे अशा अनेक त्रुटी ‘सकाळ’च्या मालिकेतून चव्हाट्यावर आल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाने संबंधित यंत्रणेची बैठक घेतली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या ‘मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइन्स सिटिझन चार्टर’नुसार पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी मूलभूत सुविधा २४ तास उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचा पुनरुच्चार प्रशासनाने केला आहे.
अल्टिमेटम अन् पथकांची नेमणूक
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पत्र जारी करत प्रशासनाने स्पष्ट केले आहे, की पत्र निकाली निघाल्यापासून १५ दिवसांच्या आत पंपांवर स्वच्छ भारत मिशन व पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमांनुसार सर्व सुविधांची पूर्तता करावी. या आदेशाची अंमलबजावणी तपासण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. ठरवून दिलेल्या मुदतीत नियमांचे पालन न करणाऱ्या पंपांवर परवाना अटी व नियमांनुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
.......
((पॉईंटर))
या सुविधा असणे बंधनकारक
- ग्राहकांसाठी २४ तास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पिण्याची सोय असावी.
- पुरुष व महिलांकरिता वापरण्यायोग्य आणि स्वच्छ प्रसाधनगृहे २४ तास खुली असावीत.
- हवा भरण्याचे यंत्र सुरळीत व कार्यरत स्थितीत असावे.
- प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, तक्रार पेटी, दर फलक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन स्विच.
- वरील सर्व सुविधा उपलब्ध असल्याबाबतची माहिती दर्शवणारा बोर्ड पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वाराजवळ लावणे बंधनकारक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.