सामाजिक उपक्रमातून करावी जनजागृती
पोलिस अधीक्षक अमोल तांबे : हेल्मेट वाटप, रक्तदानासह जनजागृतीचे आवाहन
-----
लातूर, ता. १६ : जिल्ह्यातील १,९०० गणेश मंडळांनी पोलिस विभागाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे, ही गणेश मंडळांची सामाजिक जबाबदारी असल्याचे तांबे यांनी सांगितले.
जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे ही केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची बाब नसून स्वतःचे जीवन व कुटुंबाची सुरक्षितता जपण्याची गरज आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी हेल्मेट वाटपाचे उपक्रम आयोजित करून नागरिकांना सुरक्षित व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन तांबे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक मंडळांना भेट देतात. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याची मंडळांना मोठी संधी आहे. मंडळांनी परिसरातील दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहित करावे. हेल्मेट वाटप करताना त्याची गुणवत्ता, योग्य आकार आणि सुरक्षिततेच्या निकषांचीही काळजी घ्यावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे पोलिसांनी सांगितले.
गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजोपयोगी कार्यात योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उदगीर व निलंगा तालुक्यात काही मंडळांनी हेल्मेट वाटप तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यास मदत होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती होत आहे. इतर मंडळांनीही समाजाभिमुख उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा लातूर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
-----
सीसीटीव्ही उपक्रमालाही प्रतिसाद
गेल्या वर्षी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यंदाही मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरातील सुरक्षितता वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.