गणेशोत्सवात लेझर लाइट वापरल्यास कारवाई
जिल्ह्यात कलम १६३ लागू, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १० ः आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांमध्ये होणाऱ्या लेझर आणि बीम लाइटाच्या प्रखर वापरामुळे नागरिकांच्या आरोग्याला व डोळ्यांना होणारा धोका विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी १४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या मिरवणुका, रॅली आणि मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा, बीम लाइट व लेझर बीम लाइटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवात विविध मंडळे आणि संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन केले जाते. यावेळी वापरल्या जाणाऱ्या लेझर व बीम लाइटाच्या अतिप्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीतील लहान मुले, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक व सामान्य जनतेच्या डोळ्यांना गंभीर इजा होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
मिरवणुका शांततेच्या वातावरणात पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे गणेशोत्सव व विविध जयंती उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मंडळांनी बीम व लेझर लाइटचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.