आगार व्यवस्थापकांविरोधात
कर्मचाऱ्यांचे सामूहिक निवेदन
-----
गंगाखेडच्या १८६ कर्मचाऱ्यांची तक्रार
---
गंगाखेड, ता. ३१ (बातमीदार) : येथील आगाराचे व्यवस्थापक प्रेमचंद चोथमल यांच्या मनमानी कारभारामुळे आगारातील चालक, वाहक व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असून, अपमानास्पद वागणूक आणि मनमानी कारभार या पार्श्वभूमीवर आगार व्यवस्थापकाची तत्काळ बदली करावी, अशी मागणी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांशी अरेरावीची वागणूक, कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद बोलणे, मनमानी पद्धतीने कामाचा अतिरिक्त भार देणे, नियमानुसार काम मागितले तरी धमकावणे असे प्रकार घडत आहेत. दहा ते वीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचा अपमान केला जात असल्याने त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचत आहे. कर्मचाऱ्यांनी आजारपणामुळे रजा मागितल्यानंतर रजा नाकारली जाते. काहीवेळा रजेबाबत गैरवर्तन करून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. आगारात रोजच्या कामकाजात निर्माण होणाऱ्या तणावामुळे चालक व वाहक मानसिक दडपणाखाली सेवा बजावत आहेत. वाहन चालविताना मानसिक शांतता आवश्यक असताना अशा वातावरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून न घेता त्यांना निलंबित, बडतर्फ करण्याची धमकी दिली जात आहे. आगाराचे कामकाज सुरळीत चालावे, कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य व आत्मसन्मान जपला जावा, यासाठी आगार व्यवस्थापक प्रेमचंद चोथमल यांची तत्काळ प्रशासकीय बदली करावी, त्यांच्या गैरवर्तनाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास प्रशासकीय व कायदेशीर मार्गाने आंदोलन अथवा तक्रार दाखल करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर १८६ चालक व वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------