गंगापूर ः तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईसह ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती गंगापूरमार्फत ग्रामपंचायतनिहाय पूर्वतयारी व नियोजनास सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीच्या सभापती कविता रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ग्रामसेवकांची विशेष बैठक ता. २३ बुधवारी घेण्यात आली. यावेळी उपसभापती राजेश्वर हिवाळे व गट विकास अधिकारी सुहास वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या विकसित भारत–गारंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात अधिनियम, २०२५ अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी देण्याबरोबरच टिकाऊ व उत्पादक ग्रामीण मालमत्ता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका-संबंधित पायाभूत सुविधा तसेच अत्यंत हवामानाच्या घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी विशेष कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी VB–G RAM G अंतर्गत उपलब्ध तरतुदींचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर करण्यात येत आहे. रोजगार उपलब्ध करून देतानाच त्या रोजगारातून गावाच्या दीर्घकालीन विकासासाठी उपयुक्त व टिकाऊ मालमत्ता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामसेवकांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश ग्रामपंचायत स्तरावर कामांना स्थानिक गरजेनुसार प्राधान्य देण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. पाणी साठवण क्षमता वाढविणारी कामे, जलस्रोतांचे बळकटीकरण, भूजल पुनर्भरणास सहाय्यभूत कामे व पाणलोट क्षेत्र विकास. ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविकेला सहाय्यभूत मालमत्ता निर्मिती तसेच हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक कामे.तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमधील उपलब्ध पाणी स्रोत, टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्या, पशुधनासाठी पाणी व चारा परिस्थिती, रोजगाराची मागणी आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभीजी रामजी अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. रोजगाराची हमी आणि टिकाऊ ग्रामीण मालमत्ता निर्मिती यांची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्था व गावांची पायाभूत क्षमता मजबूत करण्याचा या अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे.पाणी सुरक्षा व रोजगार निर्मितीवर भर''
आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगताना सभापती कविता रविंद्र चव्हाण म्हणाल्या गंगापूर तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जीराम अंतर्गत उपलब्ध रोजगाराच्या संधींचा उपयोग करून गावांमध्ये जलसंधारण व पाणी सुरक्षा वाढविणारी टिकाऊ कामे निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच गावाची पाणी उपलब्धता आणि दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. बैठकीत ग्रामसेवकांना आपापल्या ग्रामपंचायतीतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन प्राधान्यक्रमानुसार कामांची यादी, अपेक्षित रोजगार निर्मिती, जलसंधारण क्षमता व आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पंचायत समिती स्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे परीक्षण करून संबंधित विभागांशी समन्वय साधत आवश्यक त्या उपाययोजनांना गती देण्यात येणार आहे. रोजगार निर्मिती, जलसुरक्षा आणि शाश्वत ग्रामीण विकास यांचा मेळ घालून तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे परिणाम कमी करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.