ABD26J82381
गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यासाठी भेंडाळा फाट्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको करताना शेतकरी व ग्रामस्थ.
गंगापूर तालुक्यात तीन ठिकाणी आंदोलन
-
नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी प्रशासनाचे लेखी आश्वासन
गंगापूर, ता. ३० (बातमीदार) : नांदूर-मधमेश्वर कालव्याचे रब्बी आवर्तन तातडीने सोडावे आणि उन्हाळी आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, या मागणीसाठी आधार शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष पंडितअण्णा शिंदे यांनी वैजापूर पाटबंधारे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी शुक्रवारी (ता.३०) तालुक्यातील विविध महामार्गांवर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
सकाळी अकराला गंगापूर-वैजापूर मार्गावरील मुद्देश वाडगाव पाटी येथे शेतकऱ्यांनी अर्धा तास महामार्ग रोखून धरला. यामध्ये शिंगी, पिंपरी, नरहरी रांजणगाव, खडक वाघलगाव, झोडेगाव, वाहेगाव, नेवरगाव, माहुली, मांजरी, सावखेडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय सकाळी दहाला गंगापूर-लासूर मार्गावरील सिरसगाव फाटा येथे आणि दुपारी तीनला छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे बाबरगाव, बाळापूर, सुरेवाडी, मौजाबाद, पिंपळवाडी, सय्यदपूर व अंतापूर भागातील शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार नियोजन भेंकरून रब्बी आवर्तनास मंजुरी मिळताच पाणी सोडले जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात वाल्मीक शिरसाठ, उद्धव काळे, भाऊसाहेब शेळके, शिवाजी लोहकरे, निवृत्ती सोनवणे, चंद्रकांत सुकासे यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे, युसुफ पठाण, गोपनीय शाखेचे मनोज नवले यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.