Raj Thackeray Sabha In Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : गर्दी जमवली आता मतंही द्या!

मनसेची आर्त हाक

अतुल पाटील

औरंगाबाद - मुंबईतील गुढीपाडवा सभा, ठाण्यातील उत्तरसभा आणि अयोध्या दौऱ्यापूर्वीची औरंगाबादची सभा. महिनाभरातील या तिन्ही सभांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राजकारण स्वत:भोवती ठेवले आहे. यातही निवडणुकांव्यतिरिक्त झालेली औरंगाबादची सभा विराटच म्हणावी लागेल. ‘राज ठाकरेंच्या सभा ऐकायला लोक येतात. मनोरंजन होते, मात्र, त्यांना गर्दीच्या तुलनेत मते मिळत नाहीत’, असे म्हणत विरोधक मजा घेतात. हीच बाब मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना फारच लागल्याचे यानिमित्त समोर आले. ‘गर्दी जमवली आणि आता मतेही द्या!’ अशी आर्त हाक देण्याची संधी ‘राजसभे’पूर्वी पक्षाच्या नेत्यांनी साधली.

राज ठाकरे यांची येथील सभा इतिहास, महाराष्ट्र, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भोंग्यावरच झाली. यात ते शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चकार शब्दही बोलले नाहीत. औरंगाबादच्या पाणीप्रश्नाचा सुरवातीलाच त्यांनी ओझरता उल्लेख केला. सभेला परवानगी देऊ नका, नाहीतर सभेत गोंधळ घालू, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. याच पार्श्‍वभूमीवर सभेतील सुरवातीच्या गोंधळावर राज ठाकरे यांनी टिपण्णी केली. ‘काही टाळकी गडबड करायला लागली तर तिथल्या तिथे हाणा, ही मनसेची सभा आहे. चौरंग करून घरी पाठवीन,’ अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. मात्र, लाऊडस्पिकरच्या मांडणीमागे ज्यांना ऐकायला येत नव्हते, ते ‘आवाज आवाज’ म्हणून ओरडत होते. सभेदरम्यान, अजान लागली आणि हाच धागा पकडून, ‘एकदा काय ते होऊनच जाऊदे’ असे राज बोलले खरे मात्र, त्यावेळी मैदानातील अनेकांनी आम्हाला अजान ऐकूच आली नाही, असे सांगितले.

औरंगाबादच्या सभेला येण्यापूर्वी राज ठाकरे वढू बुद्रूक येथे छत्रपती संभाची महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार, अशी बातमी जेव्हा आली. त्यावेळी सोशल मीडियावर ‘संभाजीराजे वडिलांशी भांडून मोगलांना जाऊन मिळाले होते,’ हे राज ठाकरे यांचे वक्तव्य व्हायरल झाले होते. औरंगाबादच्या सभेत ‘संभाजीनगर’ या नावाबाबत बोलतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रत्यक्ष भाषणात त्यांनी ‘जो इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल विसरला’ असे सांगत संत ज्ञानेश्‍वर, अल्लाउद्दीन खिलजी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उलगडला. शिवराय गेल्यानंतर औरंगजेब औरंगाबादेत आला आणि पुढची २७ वर्षे इथेच राहिला. त्याला संभाजीराजे नडले होते, असे गौरवोद्गार काढले. यावर अशीही चर्चा आहे, की संभाजीराजे यांच्यावरील वक्तव्याने डॅमेज झालेली इमेज आधी सुधारून नंतरच ‘संभाजीनगर’च्या नावाचा आग्रह धरला तर, योग्य राहील. म्हणूनच आजच्या सभेत तो उल्लेख केला नसावा, असा तर्क सभेनंतर काहींनी काढला.

मनसेने ‘ब्ल्यू प्रिंट’ गुंडाळून कट्टर हिंदुत्व स्वीकारले आहे. ‘आम्ही धर्मांध नाही, धर्माभिमानी आहोत.’ या प्रकारची राज ठाकरे यांची सभेची टीजर जाहीर झाली. मात्र, भोंगा विषयावर बोलताना ‘हा सामाजिक विषय आहे, धार्मिक नाही. जर धार्मिक वळण दिले तर, त्याला धर्मानेच उत्तर देऊ.’ तसेच ‘मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर, त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा’, ही भूमिका आणि इशारा नेमके काय दर्शवितो, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. ‘नवनिर्माणाच्या’ वाटेवरून ‘हिंदुत्वाच्या’ वाटेवर जाताना जसा झेंडा बदलला तसा, त्या भगव्या झेंड्यावर छत्रपतींच्या स्वराज्याची राजमुद्राही झळकत होती. मात्र, निवडणुकांना सामोरे जायचे तर, पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोचले पाहिजे, म्हणून पुन्हा मनसेच्या झेंड्यावर मोठ्या प्रमाणात इंजिन झळकले. हा बदल औरंगाबादच्या सभेपूर्वी घडून आला आहे.

अयोध्या दौऱ्याआधी महाराष्ट्रात ऐतिहासिक सभा व्हावी, यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आले होते. यासोबतच स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे ‘ही पहा औरंगाबादची ताकद’ या म्हणण्याला तथ्याचा आधार नाही. सभेला अयोध्येतून दोन हजार लोक येणार ही देखील अफवाच ठरली. वास्तविक मनसेमध्ये उर्वरित महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यातील संपर्क प्रमुख नेमण्याची पद्धत होती. या परंपरेला फाटा देत मराठवाड्याची जबाबदारी राज ठाकरे यांनी सोलापूरच्या दिलीप धोत्रे यांच्यावर टाकली आहे. मराठवाड्यातील गट, तट संपवण्यासाठी वर्षभर त्यांनी प्रयत्न केले आहे. त्याचेच प्रतिबिंब कालच्या औरंगाबादेतील विराट सभेत दिसले. ठाण्यातील सभेनंतर दिलीप धोत्रे यांनीच औरंगाबादेत सभा घेण्याची विनंती केल्याचे राज ठाकरे यांनीच सभेत सांगितले. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी भाषणही आटोपते घेतल्याने सभा निर्विघ्न पार पडली.

मनपा निवडणुकीचे रणशिंग

प्रास्ताविकातच जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी महापालिकेवर शिवमुद्रा असलेला झेंडा फडकवायचा आहे, असे सांगताना पाणीप्रश्‍नावरून शिवसेनेवर टीका केली. दिलीप धोत्रे यांनीही ‘बघितली का मनसेची ताकद! आठ दिवसाला शहराला पाणी देता, महापालिका निवडणुकीत शहर तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही’ असा इशारा शिवसेनेला दिला. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी तर, गर्दीचे कौतुक केल्यानंतर ‘तुम्ही मनसेला मत देणार का नाही?’ असा थेटच प्रश्‍न केला. अभिजित पानसे यांनी ‘ही ऊर्जा जपून ठेवा, भाषणाला गर्दी होते. पण ही गर्दी निवडणुकीत मनसेला मते देत नाही. याच मनसैनिकांनी काम केले तर, संभाजीनगरचा पुढचा महापौर हा मनसेचा असेल, अशी गर्जना करण्यात आली. मनसे अध्यक्ष बोलले नसले तरी, इतर सगळ्याच नेत्यांनी जणू या सभेतून औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT