छत्रपती संभाजीनगर

सरकारी आरोग्य योजना : सामान्य नागरिकांना मिळणारे आरोग्य संरक्षण

CD
((((आरोग्य विमा)))) ----- सरकारी आरोग्य योजना : सामान्य नागरिकांना मिळणारे आरोग्य संरक्षण आजच्या काळात गंभीर आजार, शस्त्रक्रिया, अपघात किंवा दीर्घकालीन उपचारांसाठी मोठा आर्थिक खर्च येऊ शकतो. अनेक कुटुंबे केवळ आर्थिक परिस्थितीमुळे योग्य उपचार घेण्यास विलंब करतात. मात्र, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून पात्र नागरिकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळण्याची तरतूद आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी आरोग्य योजनांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. १. आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना केंद्र सरकारची ही महत्त्वाची आरोग्य संरक्षण योजना आहे. पात्र कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते. आर्थिक परिस्थिती किंवा उत्पन्नाची अट न ठेवता ७० वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र आयुष्मान वय वंदना कार्डची तरतूद आहे. ज्या कुटुंबात आधीच आयुष्मान योजनेचा लाभ मिळतो, त्या कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठांना स्वतःसाठी अतिरिक्त पाच लाखांपर्यंतचे स्वतंत्र संरक्षण मिळू शकते. इतर पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी कुटुंबाच्या आधारावर पाच लाखांपर्यंतचे संरक्षण उपलब्ध आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये - पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण - सूचीबद्ध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार - दुय्यम व तृतीय स्तरावरील रुग्णालयीन उपचारांचा समावेश - कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय किंवा लिंग यावर सामान्यतः मर्यादा नाही - पात्रतेनुसार पूर्वीपासून असलेल्या आजारांनाही पहिल्या दिवसापासून संरक्षण - देशभरातील सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये पोर्टेबिलिटीची सुविधा २. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना महाराष्ट्र शासनाची ही महत्त्वाची आरोग्य योजना आहे. पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जाणारी योजना १ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या नावाने कार्यान्वित झाली. १ जुलै २०२४ पासून या योजनेचा विस्तार करून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसोबत एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली. प्रमुख वैशिष्ट्ये - महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी विस्तारित आरोग्य संरक्षण - पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंतचे कुटुंबाधारित आरोग्य संरक्षण - सूचीबद्ध सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार - विविध विशेष वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश - पूर्वअस्तित्वातील आजारांसाठी पहिल्या दिवसापासून संरक्षण - योजनेच्या नियमानुसार आपत्कालीन परिस्थितीत उपचार मिळविण्याची सुविधा ३. आयुष्मान भारत आरोग्य मंदिर ही रुग्णालयीन विमा योजना नसून प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. याअंतर्गत नागरिकांना स्थानिक पातळीवर पुढील सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. - प्राथमिक आरोग्य तपासणी - रक्तदाब व मधुमेह तपासणी - माता व बालआरोग्यसेवा - लसीकरण - संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण - आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा ४. कर्मचारी राज्य विमा योजना खासगी किंवा औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) ही महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. योजनेच्या लागू अटींनुसार कर्मचाऱ्यांना आणि पात्र अवलंबित कुटुंबीयांना वैद्यकीयसेवा मिळतात. यामध्ये पुढील सुविधा समाविष्ट असू शकतात : - बाह्यरुग्ण उपचार - रुग्णालयात दाखल करून उपचार - औषधे व वैद्यकीय तपासण्या - पात्रतेनुसार आजारपण, प्रसूती व अपंगत्वाशी संबंधित रोख लाभ - कामाच्या ठिकाणी झालेल्या रोजगारजन्य दुखापतींसाठी वैद्यकीय व इतर लाभ ५. केंद्र सरकार आरोग्य योजना केंद्र सरकारचे पात्र विद्यमान व निवृत्त कर्मचारी, तसेच नियमानुसार पात्र कुटुंबीय यांच्यासाठी ही योजना आहे. यामधील सुविधा, तरतुदी : - बाह्यरुग्ण वैद्यकीयसेवा - औषधांची सुविधा - निदान चाचण्या - सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये उपचार - पात्रतेनुसार वैद्यकीय खर्चाची परतफेड ६. माजी सैनिकांसाठी ईसीएचएस योजना माजी सैनिक आणि नियमानुसार पात्र अवलंबित कुटुंबीयांसाठी एक्स सर्व्हिसमेन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस) कार्यरत आहे. याअंतर्गत संबंधित पॉलिक्लिनिक आणि सूचीबद्ध रुग्णालयांमधून वैद्यकीयसेवा मिळू शकतात. पात्रतेनुसार बाह्यरुग्ण सेवा, औषधे, तपासण्या आणि रुग्णालयीन उपचार उपलब्ध असतात. ७. प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम किडनीच्या गंभीर आजारामुळे नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालये आणि संबंधित केंद्रांमार्फत डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिली जाते. पात्र गरीब रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळण्याची तरतूद आहे. ८. राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत माता, बालके, ग्रामीण व शहरी गरीब नागरिकांसाठी विविध आरोग्यसेवा राबविल्या जातात. यामध्ये माता व बालआरोग्यसेवा, नियमित लसीकरण, क्षयरोग नियंत्रण, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, प्राथमिक आरोग्यसेवा, कुटुंब नियोजन व आरोग्य जनजागृती यांचा समावेश आहे. ९. जननी सुरक्षा योजना गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसूतीस प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. पात्र महिलांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळू शकते. १०. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम गर्भवती महिला आणि आजारी नवजात बालकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये मोफत किंवा विनामूल्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. योजनेच्या तरतुदी : - मोफत प्रसूतीसेवा - सिझेरियन प्रसूती - औषधे व आवश्यक तपासण्या - रक्ताची सुविधा - आहार - रुग्णवाहिका व संदर्भ वाहतूक - आजारी नवजात बालकांसाठी आवश्यक उपचार ११. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम बालकांमधील जन्मजात दोष, आजार, पोषणविषयक कमतरता आणि विकासातील विलंब यांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. शाळा आणि अंगणवाडी स्तरावर तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा दिली जाते. १२. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना औषधांचा खर्च कमी करण्यासाठी जनऔषधी केंद्रांमधून दर्जेदार जेनेरिक औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिली जातात. विशेषतः मधुमेह, रक्तदाब आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना औषधांच्या खर्चात बचत होण्यास मदत होऊ शकते. १३. राष्ट्रीय आरोग्य निधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना काही गंभीर व जीवघेण्या आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची ही केंद्र सरकारची योजना आहे. मदत विशिष्ट पात्रता, रुग्णालय, आजार आणि लागू नियमांनुसार दिली जाते. या गोष्टी लक्षात ठेवा १. सरकारी योजनेत नाव आहे म्हणून प्रत्येक आजाराचा उपचार मोफत मिळेलच असे नाही. २. संबंधित उपचार योजनेच्या मंजूर पॅकेजमध्ये असणे आवश्यक असू शकते. ३. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालय त्या योजनेत संलग्न आहे का, याची खात्री करा. ४. कॅशलेस उपचारासाठी आवश्यक पूर्वपरवानगी आणि कागदपत्रांची पूर्तता करा. ५. आपत्कालीन परिस्थितीत उपचारास विलंब करू नका. रुग्णालयाला योजनेची माहिती तातडीने द्या. ६. उपचार नाकारल्यास किंवा योजनेचा लाभ न दिल्यास कारण लेखी स्वरूपात मागा आणि संबंधित तक्रार निवारण यंत्रणेकडे दाद मागा. - ॲड. डॉ. प्रमोद चव्हाण ९४२२२०१३९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

बुधाच्या राशीबदलामुळे ५ राशींचे अच्छे दिन! नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् धनलाभाचे योग

"मी नाना पाटेकरांनाही मारेन..." 'लगान' फेम अभिनेत्याचा थेट दिलेला इशारा! नानांसोबत अनुभव सांगत म्हणालेले...

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

BEST Bus: हायकोर्टाचा विरोध, तरीही छठपूजेसाठी बेस्टच्या जुहू बीचसाठी जादा बस

SCROLL FOR NEXT