महिनाभर विशेष तपासणी;
उपचार, जनजागृती उपक्रम
नांदेड : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून विशेष आरोग्य तपासणी, उपचार, शिबिरे आणि जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
अभियानांतर्गत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारासाठी ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येतील. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मोतीबिंदू तपासणीवर विशेष भर राहणार आहे. तीव्र व मध्यम रक्तक्षय असलेल्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक उपचारांसह एफसीएम (फेरिक कार्बोक्झिमाल्टोज) इंजेक्शन देण्यात येणार आहे. ३० वर्षांवरील नागरिकांची घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात येणार आहे.
रुग्णांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट
रक्तदान शिबिरे, अवयवदान संकल्प, पोषण व रक्तक्षय जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांगजन सहयोग, जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले वितरण असे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू नसलेल्या रुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुर्बल घटकांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.