आगीनंतर फटाका साठ्यांवर बडगा
--
हिंगोलीमध्ये नागरी वस्तीतून तीन ट्रॉली फटाके जप्त
--------------------------
हिंगोली, ता. ६ (बातमीदार) : शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरातील फटाक्यांच्या साठ्यास सोमवारी (ता. पाच) रात्री लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने मंगळवारी (ता. सहा) सकाळपासूनच नागरी वस्त्यांत साठा केलेल्या फटाक्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली.
पोलिस, महसूल, नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शहरात सात ठिकाणी तपासणी केली. यावेळी चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून आलेला तीन ट्रॅक्टर ट्रॉली फटाक्यांचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आला. मोठ्या प्रमाणातील जप्त फटाक्यांची सुरक्षित विल्हेवाट कशी लावायची, तोपर्यंत ते ठेवायचे कुठे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
‘संगीत साधना’चे साहित्य खाक
--
सुमारे पन्नास वर्षांपासून संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देणाऱ्या विद्यालयातील तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटार आदी वाद्ये या आगीत खाक झाली. हे दृश्य पाहून गायनाचे धडे घेणाऱ्या शिष्यांचे डोळे पाणावले. अनुराधा नांदेडकर या संगीत साधना विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे धडे देतात. त्यांनी अनेक शिष्य घडविले. अनुराधा नांदेडकर या स्वतः वयाच्या ८० व्या वर्षीही रोज पहाटे पाचपासून रियाज करतात. काल रात्री अनुराधा नांदेडकर व त्यांच्या स्नुषा श्वेता घरात असताना फटाक्यांचे आवाज सुरू झाले. समोरील घरास आग लागल्याचे लक्षात येताच दोघींना मागील दाराने घराबाहेर काढण्यात आले.
दोघांची ओळख पटली
-
आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दोघांची आज ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. विजयकुमार रामकृष्ण बासटवार (७६, रा. मारवाडी गल्ली, हिंगोली), अविनाश काशीनाथ बांगर (२६, रा. वंजारवाडा, हिंगोली) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. या घटनेत जखमींत राजगोपाल विजयकुमार बासटवार, श्रावणी राजगोपाल बासटवार, लता विजयकुमार बासटवार, भरत चौधरी, कपिल खंडेलवाल, सय्यद मन्नान सय्यद सत्तार, आरव चौधरी, कृष्णा अग्रवाल, सुनील बांगर, अनुप अग्रवाल, आयोध्या लक्ष्मीनारायण चौधरी (सर्व रा. हिंगोली) यांचा समावेश आहे. जखमींवर खासगी, शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी आकाश सांगळे यांची प्रकृती गंभीर असून, रवी कांबळे, दिलीप दोडके यांनाही दुखापत झाली आहे. तिघांनाही लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
वाचविण्यासाठी गेला अन्...
--
अविनाश काशीनाथ बांगर हा एका कापड विक्रीच्या दुकानावर कामाला होता. दुकानापासून हाकेच्या अंतरावर आग लागल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांसोबत अविनाशने घरात कुणी अडकले तर नाही ना, हे पाहण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान फटाक्याचा मोठा स्फोट झाला आणि अविनाशचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.