ABD26J82929 ः श्रीचक्रधर मुंगल
वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकीकरण
-
२३.७१ कोटींचा निधी मंजूर; विद्यार्थ्यांसाठी सुविधा; तर रुग्णांना दर्जेदार उपचार
हिंगोली, ता. ८ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयातील तृतीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विविध नऊ विभागांसाठी तब्बल २३ कोटी ७१ लाख ५३ हजार ८३५ रुपयांची आधुनिक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षातील राज्य योजनांतर्गत उपलब्ध अनुदानातून ही खरेदी प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे. या निधीतून प्रामुख्याने, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, कान-नाक-घसा विभाग, औषधवैद्यकशास्त्र, बाह्यरुग्ण विभाग, यांसह एकूण नऊ महत्त्वाच्या विभागांसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. या अत्याधुनिक साधनसामुग्रीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना उच्च दर्जाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळणे सुलभ होणार आहे. तसेच, सर्वसामान्य व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच अचूक निदान आणि अद्ययावत उपचार मिळून आरोग्यसेवेचा दर्जा अधिक उंचावणार आहे. दरम्यान, ही खरेदी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, शासकीय नियम आणि केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
चौकट
तज्ज्ञ डॉक्टरांची फौज सज्ज
हिंगोलीत सुमारे अडीच वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रशासकीय बदलामुळे रुग्णालयात विविध विषयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी भर पडली असून कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी, रुग्णांना जागेवरच जलद व प्रभावी उपचार मिळत आहेत. एकेकाळी किरकोळ किंवा गंभीर बाबींसाठी रुग्णांना नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथे ‘रेफर’ करावे लागत होते; मात्र आता ते प्रमाण जवळपास संपुष्टात आले असून गंभीर रुग्णांवरही हिंगोलीतच यशस्वी उपचार होत आहेत.
--
प्रतिक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तातडीने, सन्मानाने आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या अनुषंगाने प्रत्येक विभागाला स्पष्ट निर्देश दिले असून रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. शासनाने मंजूर केलेल्या या कोट्यवधींच्या निधीमुळे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होणार असून, यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासोबतच रुग्णसेवेचा चेहरामोहरा बदलेल.
- डॉ. श्रीचक्रधर मुंगल,
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली