दिवाळीनिमित्त लेख...
-----------------
शाळाशाळांतून पेटवूया ज्ञानदीप...
दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करण्याचा आणि नव्या आशा-आकांक्षांना उजाळा देण्याचा सण. घराघरांत पणत्या उजळतात, अंगणात रांगोळ्या फुलतात आणि वातावरण आनंदाने भारून जाते. मात्र, या दिवाळीत एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपल्या शाळांमध्ये ज्ञानाचा दिवा तेवढ्याच निष्ठेने पेटतो आहे का? शासनाचे विविध उपक्रमांचे ऑनलाइन अहवाल, जनगणना, एसआयआर अशा विविध सरकारी मोहिमांचा भार खांद्यावर घेत आजच्या शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे का? अनेक शिक्षक बांधव ही सर्व तारेवरची कसरत आपले विद्यार्थी कसे घडतील? यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताहेत. या शिक्षक बांधवांमागील अतिरिक्त कामांचा ताण कमी झाल्यास नक्कीच ते भावी पिढीच्या जडणघडणीसाठी पूर्ण क्षमतेने योगदान देऊ शकतील. त्यातूनच ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होण्यास मदत मिळेल.
- उद्धव भा. काकडे
------------------
शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकविणारा कर्मचारी नाही, तर तो समाजाच्या जडणघडणीचा शिल्पकार आहे. एका शिक्षकाच्या विचारातून अनेक पिढ्यांचे भविष्य घडत असते. पूर्वी शिक्षक म्हटले की ज्ञान, शिस्त, संस्कार, समर्पण आणि विद्यार्थ्यांविषयीची आस्था हे गुण डोळ्यांसमोर उभे राहत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वतःचा वेळ देणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रसंगी स्वतःच्या खिशातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे शिक्षक समाजात आदर्श मानले जात. आजही असे शिक्षक आहेत; मात्र बदलत्या परिस्थितीत या आदर्श शिक्षकांच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
आज शिक्षणव्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, ऑनलाइन अभ्यासक्रम, विविध शैक्षणिक उपक्रम आणि मूल्यांकनाच्या नव्या पद्धती आल्या. शिक्षकांच्या हातात तंत्रज्ञानाची मोठी ताकद आली. परंतु, या सगळ्या बदलांत विद्यार्थ्यांशी असलेला थेट संवाद, वैयक्तिक लक्ष आणि भावनिक नाते हरवत तर नाही ना? काही ठिकाणी अध्यापनापेक्षा प्रशासकीय कामे, ऑनलाइन माहिती भरणे, अहवाल सादर करणे, विविध उपक्रमांचे छायाचित्रण आणि कागदपत्रांची पूर्तता यांनाच अधिक महत्त्व द्यावे लागते. परिणामी, वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपलब्ध होणारा वेळ कमी होतो. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींचाही विचार करावा लागेल. या त्रुटी दूर करण्याची जबाबदारी ही धोरणकर्त्यांवर नक्कीच आहे.
----
सकारात्मक बदलांची नांदी व्हावी
शिक्षकाने शिकणे थांबविले, तर विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा कशी मिळणार? केवळ उपस्थिती नोंदवून शिक्षकाचे कर्तव्य संपत नाही; विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणे ही त्याची खरी जबाबदारी आहे. शहरी व ग्रामीण भागात आपल्याला अनेक शिक्षक प्रयोगशीलता जपत त्यांच्या शाळांना पुढे आणण्यात योगदान देताना दिसतात. अशा शिक्षकांना प्रोत्साहन देऊन इतर शाळाही त्याच वाटेवर चालत प्रगतीची दिशेने मार्गक्रमण करतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील ज्ञानदान हे सकारात्मक बदलांची नांदी ठरावे, हीच अपेक्षा आहे.
----
शिक्षक हीच शिक्षणव्यवस्थेची खरी ताकद
वाढत्या अशैक्षणिक कामांची जंत्री, अपुऱ्या सुविधा यामुळे अनेकदा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अडसर येत असतो. काही ठिकाणी शिक्षकांना दोष दिला जातो. मात्र, सर्वच शिक्षकांना एकाच मापात मोजणे अन्यायकारक ठरेल. आजही दुर्गम भागातील शाळांमध्ये अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची रिक्त पदे, मोठ्या वर्गसंख्या आणि मर्यादित साधनसामग्री असूनही अनेक शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. स्वतःच्या प्रयत्नांतून शाळांचा चेहरामोहरा बदलणारे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे, वाचनाची आवड निर्माण करणारे आणि गळती रोखण्यासाठी पालकांशी संवाद साधणारे शिक्षक हीच शिक्षणव्यवस्थेची खरी ताकद आहे. त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणेही तितकेच आवश्यक आहे.
----
व्यवस्थेतील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज
या दिवाळीत शाळा, शिक्षक, पालक आणि प्रशासन यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिक्षकांनी अध्यापनाला सर्वोच्च प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा शोध घ्यावा. प्रशासनाने अनावश्यक कागदोपत्री कामांचा भार कमी करून शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ द्यावा. पालकांनीही केवळ गुण आणि निकाल यांपुरते न पाहता मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेला सहकार्य करावे. दिवाळीत घरातील अंधार दूर करण्यासाठी आपण पणती पेटवतो; मात्र समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षकाने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जिज्ञासा, आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि माणुसकीची ज्योत पेटली, तरच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट साध्य होईल. शिक्षकाने स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा ज्ञानदानाच्या मूळ भूमिकेकडे वळण्याची हीच वेळ आहे. कारण, दिवाळीतील पणती काही तास प्रकाश देते; पण शिक्षकाने पेटविलेला ज्ञानाचा दिवा आयुष्यभर वाट दाखवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.