शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी ः आमदार बनसोडे
--
उदगीर, ता. १२ (बातमीदार) : उदगीर व जळकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. पावसाअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे.
खरीप हंगामात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी आ. बनसोडे यांनी त्यांच्याकडे केली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीकविमा व इतर शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून द्यावा, तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनात नमूद केली आहे.
यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, पंचायत समितीचे उपसभापती विकी भोसले, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.