इसापूर उजव्या कालव्यातून एक नोव्हेंबरपासून आवर्तन
---
हंगामांत प्रत्येकी दोन आवर्तने; नांदेड जिल्ह्यातील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
------
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २७ : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजव्या कालव्याद्वारे २०२६-२७ या वर्षातील रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्राथमिक सिंचन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्या सोडण्यात येणार असून, रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सिंचन कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी इसापूर धरणातील पाणीसाठा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सिंचनासाठी इच्छुक लाभधारकांनी नमुना क्रमांक ७ आणि ७-अ मधील पाणी मागणी अर्ज विहित मुदतीत संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने पाच ऑक्टोबरला दिलेल्या आदेशानुसार, एल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर उपलब्ध राहणाऱ्या पाणीसाठ्याआधारे सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाले तसेच मुख्य कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभधारकांनाही या कार्यक्रमानुसार पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंजुरीच्या अटींचे किंवा महाराष्ट्र पाटबंधारे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सिंचन नियोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
--------
पाणीपाळ्यांचे वेळापत्रकएक पुढीलप्रमाणे
रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी : १ ते २४ नोव्हेंबर २०२६
रब्बी हंगामातील दुसरी पाणीपाळी : २० डिसेंबर ते १३ जानेवारी २०२७
उन्हाळी हंगामातील पहिली पाणीपाळी : १ ते २४ मार्च २०२७
उन्हाळी हंगामातील दुसरी पाणीपाळी : २० एप्रिल ते १४ मे २०२७
---
नियोजित कालावधी २४ दिवसांचा
प्रत्येक पाणीपाळीचा नियोजित कालावधी २४ दिवसांचा आहे. मात्र, पाऊस, तांत्रिक अडचणी किंवा अन्य आकस्मिक कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला प्राधान्य राहणार असून, परिस्थितीनुसार सिंचन कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार सनियंत्रण समितीकडे असतील.
----
थकबाकी भरल्याशिवाय सिंचनासाठी पाणी नाही
सिंचनासाठी पाणी मागणी अर्जासोबत उपसा सिंचनाची संबंधित परवानगी जोडणे आवश्यक आहे. पिकांचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे. तसेच लाभधारकांनी संपूर्ण थकीत पाणीपट्टी भरलेली असणे बंधनकारक आहे. अर्ज नामंजूर झाल्यास किंवा पाणीपट्टी थकीत असल्यास संबंधित लाभधारकांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार नाही. कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोचविण्यासाठी आवश्यक असलेली शेतचारी स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची असेल. मंजूर कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाण्याचा वापर करणे आवश्यक राहणार आहे.
-----
विनापरवानगी पाणी उपशावर कारवाई
पाणीपाळीदरम्यान विनापरवानगी विद्युत मोटारी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पाणी उपसा करणे अथवा कालव्याची दारे उघडणे असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित केलेल्या लाभ क्षेत्रात पाणी मागणी, पाणीपट्टी वसुली आणि सिंचन नियंत्रणाची जबाबदारी संबंधित संस्थांवर राहणार आहे. कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता, तांत्रिक अडचणी किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे पाणी सोडण्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.