अपघातग्रस्तासाठी जनशताब्दी
दोन किलोमीटर नेली ‘रिव्हर्स’!
--
नगरसूल-तारूरदरम्यान रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : नगरसूल-तारूरदरम्यान धावत्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधून एक शिक्षिका खाली पडल्याची घटना घडली. हे समजताच जखमी महिलेला घेण्यासाठी रेल्वे उलट दिशेने धावली. ही घटना गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी नगरसूल-तारूरदरम्यान घडली. मात्र, त्या शिक्षिकेचे प्राण वाचू शकले नाही. सुमनांजली गेणूजी बनसोडे (वय ५३, रा. पाचोड बु., ह. मु. कांचनवाडी) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
रेल्वे सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका सुमनांजली या राखी पौर्णिमेसाठी माहेरी गेल्या होत्या. नातेवाइकांसोबत त्या दादर-हिंगोली (१२०७१) जनशताब्दी एक्स्प्रेसने गुरुवारी परत येत होत्या. नगरसूल आणि तारूर रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे सुरू असताना, त्या वॉशबेसीनजवळ हात धुण्यासाठी गेल्या. त्यावेळी रेल्वेचा अचानक झटका बसल्याने त्यांचा तोल जाऊन त्या डब्याबाहेर पडल्या. ही घटना नगरसूल जवळील गेट नंबर १३ च्या परिसरात घडली. हे पाहताच नातेवाइकांसह प्रवाशांनी आपत्कालीन साखळी (चेन) ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच नातेवाइक मागच्या दिशेने धावले. दरम्यान, रेल्वेतील ट्रेन मॅनेजरने सॅट सिस्टीमद्वारे कंट्रोल रूमशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कंट्रोल रूमकडून रेल्वे मागे नेण्यासाठी परवानगी मिळताच रेल्वे सुमारे दोन किलोमीटर मागे (रिव्हर्स) घेण्यात आली.
रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे सेनेच्या सदस्यांनी जखमी सुमनांजली यांना डब्यात घेतले. त्यानंतर रेल्वे न थांबता थेट छत्रपती संभाजीनगर स्थानकाकडे धावली. तोपर्यंत रेल्वेस्थानकावर रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सेनेच्या सदस्यांनी नातेवाइकांसोबत सुमनांजली यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.