शेतकऱ्यांनो, उसाऐवजी
ज्वारीला प्राधान्य द्या
-------
दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी विभागाचा सल्ला
-----------
जळकोट, ता. ८ (बातमीदार) ः शेतकऱ्यांनी उसाऐवजी ज्वारीला प्राधान्य द्यावे, असा सल्ला कृषी विभागाने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिला आहे.
तालुक्यात सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाला उन्हाळ्यात पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे पाठ फिरवत आहेत. अशा परिस्थितीत कमी पाण्यात येणाऱ्या आणि चांगला बाजारभाव मिळवून देणाऱ्या ज्वारी पिकाला प्राधान्य देण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात ज्वारीचे क्षेत्र कमी झाले होते. दुष्काळी परिस्थिती पाहता तालुक्यातील अन्य भागांतील शेतकऱ्यांनीही उसाऐवजी ज्वारीचा पर्याय निवडणे हिताचे आहे. नदीकाठच्या गावात विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचा काटकसरीने वापर करून ठिबक सिंचनाद्वारे ज्वारीची लागवड केल्यास कमी कालावधीत उत्पादन घेता येईल. ज्वारी पिकासाठी बियाणे टोकून ठिबकद्वारे पाणी दिल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते.
गेल्या वर्षी अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात आणि उत्पादनात घट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी हरभरा, करडई आणि सूर्यफूल या पिकांकडे मोर्चा वळवला होता. आता मालदांडी ज्वारीला सध्या किलोमागे १०५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा भाव आगामी काळात शिखरावर जाण्याची शक्यता आहे.
------------
((कोट))
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने उसाला उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळेल, याची खात्री नाही. अशा वेळी पाण्याचे उपलब्ध स्रोत पाहूनच पीक नियोजन करणे गरजेचे आहे. कमी पाण्यात येणारी ज्वारी, चांगला बाजारभाव आणि मंगळवेढ्याच्या ज्वारीला मिळालेले भौगोलिक मानांकन याचा विचार करता शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे. याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल.
-संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.