दीपोत्सव परभणी लेख
….
काकड आरतीने दिवाळीची चाहूल
-----
दिवाळी आल्याची खबरबात देणारी काकड आरती हा खेड्यापाड्यांतील आनंदसोहळा असायचा. गावाची झुंजरूक चैतन्यानं न्हाऊन निघायची. फुटकळ स्वरूपात का असेना, आजही ही काकड आरती गावखेड्यांना जागवत टिकून आहे.
दिवाळीची चाहूल लागताच ‘काकड आरती आली मायेव. दरोजा उघड’ भल्या पहाटेच कानावर हे शब्द पडायचे. शब्दांना लगटून टाळ-मृदंगाचा गजर घुमायचा. पाठोपाठ दारावर टकटक व्हायची. झुंजरुकातला अंधार अंगणात साचलेला असायचा. माय खडबडून चेती व्हायची. लगोलग अंगणात जायची.
--जगदीश कदम
ज्येष्ठ ग्रामीण लेखक तथा अध्यक्ष
४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन
-----------
खरीप आणि रब्बीचा हा सांधा. या सांध्यावर शेतकरी सुंदर दिवसाचं स्वप्न बघायचा. साळीचं पीक पोस्टी यायचं. मूग, उडीद अंगणभर पसरले जायचे. मिरगापासून मुगापर्यंत शेतकऱ्याची परीक्षा असायची. कणगीतली ज्वारी तळाला जायची. आधलीभर ज्वारीत पावशेर मूग घालून बरकत चाळवली जायची. त्यातल्या त्यात हे हुरड्याचे दिवस. ज्वारी पोटरीत आलेली असायची. कापसाच्या पिकात तुरीचं एक तास असायचं. त्यात पाटा घातलेला. वाळकं, शेण्या, चवळी, भेंडी असं काहीबाही पाट्यात असायचं. त्यात इरवाड उमटून पडायचं. ते आबक यायचं. इरवाडाचा धांडा सगळ्यात उंच. मस्तीखोर. त्याला हातभर लांब कणीस. टचटचीत दाण्यांनी भरलेलं. त्या कणसाचा हुरडा खाणं ही वेगळीच आनंदपर्वणी असायची. आमच्या टापूतला वराडीचा हुरडा प्रसिद्ध. वराडी हे वाण विदर्भातून आलं, असं सांगितलं जायचं. आमचा आज्या म्हणायचा, ‘पोरं हो, हुरडा खा, ताकद येते अंगात.’ मिरच्याचा ठेचा आणि दह्यासोबत हुरड्याची चव चाखणं हा आणखी वेगळ्या अनुभवाचा ठेवा. तसं पाहिलं तर आमचा हदगाव तालुका हे ज्वारीचं भांडार मानलं जायचं. १९७२ च्या भीषण दुष्काळातही हा तालुका थकला नाही, मोडून पडला नाही, असं म्हणतात. याही बाबतीत आज्या म्हणायचा, ‘जव्हर काकड आरती हाय, तव्हर घोर करायचं कारण नाही.’ कापसाचा काकडा गावभर फिरला की सगळा घोर मिटून जातो.’ खरं-खोटं आज्यालाच ठाऊक. पण त्यातलं बरंचसं सत्यात उतरायचं.
आज्याचे खूप ठोकताळे असायचे. त्यावरच जीनगानीची गणितं बेतली जायची. थंडीची चाहूल लागली म्हणजे घरोघरच्या घोंगड्यांच्या घड्या मोडल्या जायच्या.
शेतात कापसाची बोंडं फुटायचे हे दिवस. बोंडं फुटली म्हणजे पांढराशुभ्र कापूस बाहेर यायचा. या कापसाचा काकडा गावातून ऐटीत मिरवायचा. हा काकडा गावात चैतन्याची पहाट घेऊन यायचा. गावातला हमरस्ता असो अथवा सामटीचा अरुंद रस्ता असो, काकड आरतीचा काकडा घरोघर जायचा.
‘पोरं हो, आज जरा बिगीनंच आले व्हय?’
आत्याबाई, असं काय म्हणता... ती बघा, सुकराची चांदनी कोठं आली!
पांगळाचा दत्ता हातातलं आरतीचं ताट घेऊन थेट तुळशीकडं जायचा. त्याच्या पाठोपाठ झेंड्याखालचा पुंज्या डोक्यावरची कळशी हातावर तोलत तुळशीला पाणी घालायचा. सोबत काकडा. ‘आत्याबाई, आरती महादेवाकडं चालली. दोन-चार गेंदं घेऊ का?’ माय काही बोलण्याआधीच दत्ता झेंडूची फुलं ताटात कोंबायचा.
आम्ही तोंडावरची ढाबळं बाजूला सारून अंथरुणातून हे सगळं बघायचो. पोरं गेल्यावर माय दरवाजाची आगळ नीट लावून ठेवायची. तुरीच्या पल्हाट्याची झाडणी हातात घ्यायची. झाडझूड झाल्यावर पांढऱ्या मातीत शेणाचा पव्हटा कालवून सपासप सडा शिंपायची. तोवर पाठीमागे लोंबकळलेले भजनी दारावरून जायचे.
‘तो हा माधव बरवा... तो हा केशव बरवा’
हे पालुपद आळवत राहायचे. दुलबा आज्याचा लंगडा किसन्या गळ्यात अडकवलेला मृदंग जोरजोराने बडवायचा. मृदंगाची चामडी किसन्याच्या रठलेल्या बोटांनी बिथरायची. आवाजाला आरकाट करायची. मृदंगाच्या आवाजात जमेल तसे टाळ घुसायचे. टंगळमटंगळमचा सूर लागायचा.
''वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती''
अंगावर जाडीभरडी बंडी घातलेला राघो कारभारी एकच पालुपद पुन्हा पुन्हा आळवायचा. त्याच्या किरट्या आवाजानं जाग यायची. नवा भजनकरी उमटून पडायचा. अर्धवट झोपेतलं हे भजन आम्हाला जरासं खुपायचं; पण भजनकरी किती लवकर उठून गावभर फिरतात, याचं अप्रूप वाटायचं. दत्ता दिवसभर शेतात काम करतो आणि न चुकता काकड आरतीला येतो, याचं मायला भारी कौतुक. एकदा या संदर्भात मायनं त्याला छेडलं. तेव्हा तो बोलला, ‘आत्याबाई, काकड आरतीनं सगळा शीणभार हलका व्हतो. पहाटे लवकर उठलं अन् गावभर भजन म्हणत हिंडलं की समदा दिवस हलका हलका वाटायला लागतो.’
…….……..….
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.