एसटीच्या बसमार्गांतील बदलांमुळे कळंबच्या प्रवाशांची गैरसोय!
जुन्या बससेवा बंद, काहींचे मार्ग बदलले; पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा
दिलीप गंभिरे
---------
कळंब, ता. ५ (बातमीदार) : राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील बदलांचा फटका कळंब तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बससेवा बंद करण्यासह काही बसचे मार्ग बदलण्यात आल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. निलंगा-छत्रपती संभाजीनगर ही गेल्या ४० ते ५० वर्षांपासून मुरूड-ढोकी-कळंब मार्गे धावणारी बस गेल्या १५ ते २० दिवसांपासून अंबाजोगाई कारखाना मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे कळंबमधील प्रवाशांना या बससेवेपासून वंचित राहावे लागत आहे. बंद केलेल्या आणि मार्गांतरित केलेल्या बससेवा पूर्ववत कराव्यात; अन्यथा आंदोलनासह उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रवासी मित्र संघटनेचे प्रा. मोहन जाधव यांनी दिला आहे.
निलंगा-छत्रपती संभाजीनगर ही बस कळंबमार्गे धावत असल्याने परिसरातील प्रवाशांना अनेक वर्षांपासून सोयीची वाहतूक उपलब्ध होती. मात्र, अचानक मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. याशिवाय कळंब-अक्कलकोट, कळंब-जालना आणि कळंब-नांदेड यांसह अन्य लांब पल्ल्याच्या मार्गांवरील बससेवाही बंद करण्यात आल्याची तक्रार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी सुरू असलेल्या सेवाच कमी होत असल्याने एसटी महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परिवहन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्रवाशांना बससेवेसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तांदूळजा-शिराढोणमार्गे संभाजीनगर, पुण्यासाठी बसची मागणी
निलंगा-छत्रपती संभाजीनगर बस पूर्वीच्या मुरूड-ढोकी-कळंब मार्गावरून तातडीने सुरू करावी. तांदूळजा-शिराढोणमार्गे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांसाठी नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रा. मोहन जाधव यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. प्रवाशांची संख्या, मार्गाची गरज आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महामंडळाने बससेवेचे नियोजन करावे. अन्यथा प्रवासी मित्र संघटनेच्या वतीने आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
डिजिटलवर गावाचे नाव गायब; जाहिराती मात्र झळकतात!
कळंब आगारात आधुनिकतेच्या नावाखाली शिवाई आणि राजमाता जिजाऊ या नव्या बस दाखल झाल्या आहेत. मात्र, या बसवरील डिजिटल फलक प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नसल्याच्या तक्रारी आहेत. डिजिटल फलकावर हैदराबाद आणि कंपनीच्या जाहिराती झळकत असताना बस नेमकी कोणत्या गावाकडे किंवा शहराकडे जात आहे, याची माहिती मात्र दिसत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बसचे जाण्या-येण्याचे नियोजन समजण्यासाठीच डिजिटल फलकाचा उपयोग होत नसेल, तर या तंत्रज्ञानाचा उपयोग नेमका कोणासाठी, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.