केजच्या झेडपी शाळेचा ऐतिहासिक विजय
स्वामी विवेकानंद व शारदा स्कूलला चारली धूळ
केज, ता. २० (बातमीदार) ः तीन वर्षे बंद राहिल्यानंतर नव्या जोमाने सुरू झालेल्या केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला आहे. १४ ते १७ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत या शाळेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात केज शहरातील नामांकित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि शारदा इंग्लिश स्कूलसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारत, एकही विकेट न गमावता या संघाने एकतर्फी विजय मिळवला.
या देदीप्यमान विजयानंतर केजच्या जिल्हा परिषद शाळेचा संघ आता बीड जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तब्बल ३ वर्षे बंद अवस्थेत राहिलेल्या या जिल्हा परिषद शाळेला स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत नुकतेच पुनरुज्जीवित केले आहे. पुनर्रचनेच्या या पहिल्याच वर्षात येथील विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा व इतर उपक्रमांत भरीव कामगिरी करून दाखवली आहे. शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल क्रीडाप्रेमींसह संपूर्ण केज तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाळेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल माजी विद्यार्थी संघाचे सुनील हुलसूरकर, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन गुंड यांनी सर्व विजेते खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचा यथोचित बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीतर्फे हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, प्रवीण देशपांडे, पिंटू दांगट पाटील आणि फिरोज पठाण यांनी दिली. या जिल्हा परिषद शाळेला भविष्यात कोणत्याही भौतिक सुविधांची किंवा साहित्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासनही शालेय समिती व माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.