((ABD26J78525))
राजाबाजार ः दहीहंडी फोडण्याची तयारी करताना एका मंडळातील तरुण.
--
श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी शहर सज्ज!
----
मंदिरांमध्ये सजावट, गोविंदा पथकांचा सराव रंगला; घराघरांत बालकृष्णाच्या स्वागताची लगबग
--
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या स्वागतासाठी मंदिरांसह घरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाजारपेठेतही उत्साह दिसून येत आहे. गुलमंडी, कॅनॉट, औरंगपुरा, गारखेडा, टीव्ही सेंटर, बजरंग चौक आणि कैलासनगर परिसरात दहीहंडीच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू झाली असून, मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई आणि गोविंदांच्या थरांचा सराव केला जात आहे. त्याचवेळी बाजारपेठेत बालकृष्णाच्या मूर्ती, मुकुट, मोरपीस, बासरी, झुले आणि कृष्णाच्या वेशभूषेतील पोशाख खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (ता. चार) शहरातील विविध मंदिरांमध्ये कृष्णजन्म सोहळा, भजन, कीर्तन, आरती, पाळणा आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णजन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी बालगोपालांसाठी कृष्णाच्या वेशभूषा तसेच श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित कार्यक्रम होणार आहेत. बाजारात श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील पोशाख २०० ते ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बालकृष्णाला सजवल्यानंतर त्याचे फोटो आणि रील्स काढून सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंडही वाढला आहे.
--
२५ हून अधिक गोविंदा पथकांचा सहभाग
जन्माष्टमीसोबत दहीहंडी उत्सवासाठीही शहरातील विविध गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे. टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगपुरा, गारखेडा, बजरंग चौक आणि कैलासनगर परिसरात दहीहंडी फोडली जाणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी २५ हून अधिक गोविंदा पथके सहभागी होणार असून, उंच थर रचण्यासाठी तरुणांचा सराव सुरू आहे. दहीहंडीच्या ठिकाणी विद्युत रोषणाई आणि सजावटीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. गोविंदांकडून थर रचताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
--
घराघरांत कान्हाच्या स्वागताची तयारी
मंदिर आणि मंडळांप्रमाणेच घरांमध्येही जन्माष्टमीची लगबग सुरू आहे. बालकृष्णासाठी पाळणा सजवणे, पूजा साहित्याची खरेदी, नैवेद्याची तयारी तसेच छोटेखानी देखावे उभारण्याची तयारी केली जात आहे. लहान मुलांना कृष्णाच्या वेशात सजवून फोटो काढण्याचा उत्साह पालकांमध्ये दिसून येत असून, कृष्णभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.