छत्रपती संभाजीनगर

परभणीत लक्ष्मीपूजनाचा भक्तिमय उत्सव; दीपोत्सवाने उजळले शहर

CD
फोटोसह ---------- लक्ष्मीपूजन भक्तिभावाने; दीपोत्सवाने उजळले शहर ----------------------- -परभणीत फुलांची आकर्षक सजावट -घरांसमोर रांगोळ्यांची सुंदर आरास -फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ : श्रद्धा, भक्तिभाव, परंपरा, उत्साहाचा सुरेख संगम साधत परभणीकरांनी रविवारी (ता. आठ) लक्ष्मीपूजन मोठ्या आनंदात, मंगलमय वातावरणात केले. घराघरांत प्रज्वलित झालेल्या पणत्या, फुलांनी सजविलेले देव्हारे, दारापुढे रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, सुगंधी फुलांच्या माळा आणि आकाशात रंगांची उधळण करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दीपोत्सवाच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. धन, वैभव, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता असलेल्या श्री महालक्ष्मीच्या पूजनासाठी आबालवृद्धांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. भक्तिभावाने भारलेले वातावरण आणि कुटुंबीयांच्या एकत्रित आनंदाने यंदाच्या लक्ष्मीपूजनाला विशेष रंगत आली. दिवाळीतील सर्वांत महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. फुलांची दुकाने, पूजेचे साहित्य, मिठाई, फराळाचे पदार्थ, पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याला विशेष मागणी होती. झेंडूच्या फुलांच्या माळा, कमळाची फुले, सुगंधी अगरबत्त्या, पूजेचे ताट, लक्ष्मीच्या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. पारंपरिक वेशभूषेत बाजारपेठेत दाखल झालेले महिला-पुरुष, हातात खरेदीच्या पिशव्या आणि चेहऱ्यावर सणाचा आनंद अशा उत्साही वातावरणामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा दिवाळीच्या रंगात रंगून गेल्या. सायंकाळी शहरातील घराघरांत लक्ष्मीपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात पोचली. घरांच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या तोरणांनी सजविलेले दरवाजे, रंगीबेरंगी आकाशकंदील, विद्युत दिव्यांच्या माळांनी परिसर उजळून निघाला होता. अनेक घरांमध्ये फुलांच्या आकर्षक सजावटीने देव्हारे सजविण्यात आले होते. लक्ष्मीमातेची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिष्ठापित करून तिच्यासमोर दिवे, पणत्या, फळे, मिठाई, नैवेद्य आणि पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते. सायंकाळी सहानंतर बहुतांश घरांत विधिवत लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन श्री महालक्ष्मी आणि श्री गणेशाचे पूजन केले. मंत्रोच्चार, आरती, घंटानाद आणि शंखध्वनीने घराघरांतील वातावरण भक्तिमय झाले होते. लक्ष्मीमातेच्या चरणी धनधान्य, आरोग्य, सुख, शांती आणि कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. आरतीच्या वेळी एकत्र आलेल्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि भक्तिभावाने सणाचा आनंद द्विगुणित केला. --- घराघरांत मंगलमय वातावरण लक्ष्मीपूजनासाठी यंदा फुलांच्या सजावटीला विशेष महत्त्व दिल्याचे दिसून आले. झेंडू, गुलाब, विविध रंगांच्या फुलांनी सजविलेले देव्हारे, आकर्षक फुलांचे तोरण, रांगोळ्यांत सजविलेल्या पणत्या आणि प्रकाशमान दीपमाळांनी घरांना वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले. काही ठिकाणी पारंपरिक रांगोळ्यांसोबत लक्ष्मीची पावले रेखाटण्यात आली होती. दारापुढील रांगोळ्या आणि त्याभोवती प्रज्वलित केलेल्या पणत्यांमुळे प्रत्येक घराचा परिसर प्रकाशमय झाला होता. आधुनिक विद्युत रोषणाईसोबत पारंपरिक मातीच्या पणत्यांनी दिवाळीच्या संस्कृतीदर्शन घडविले. --- व्यापारी प्रतिष्ठानांतही लगबग लक्ष्मीपूजनाला व्यापारी वर्गात विशेष धार्मिक, आर्थिक महत्त्व आहे. त्यामुळे शहरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, कार्यालये, विविध आस्थापनांमध्येही आकर्षक सजावट करण्यात आली. व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांत लक्ष्मी-गणेशाची स्थापना करून हिशेबाच्या वह्या, रोकडपेटी, संगणक, व्यावसायिक साहित्याचे पूजन केले. आगामी आर्थिक वर्षात व्यवसायात भरभराट, ग्राहकांचा विश्वास, आर्थिक स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांना मिठाई आणि फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्यापारी प्रतिष्ठानांतील रोषणाई आणि पूजेनिमित्त निर्माण झालेले वातावरण शहराच्या उत्सवी वातावरणात भर घालत होते. --- आतषबाजीने उजळला आसमंत लक्ष्मीपूजनानंतर रात्री शहराच्या विविध भागांत फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. आकाशात उंच झेपावणारे रंगीबेरंगी फटाके, चमचमणाऱ्या फुलबाज्या, अनार आणि विविध रोषणाईच्या फटाक्यांनी रात्री शहराचा आसमंत उजळून निघाला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद अनुभवला. फटाक्यांच्या रंगांची उधळण, घराघरांतून ऐकू येणाऱ्या आरत्यांचे स्वर आणि सर्वत्र पसरलेला दिव्यांचा प्रकाश यामुळे शहरात चैतन्य निर्माण झाले. --- सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव लक्ष्मीपूजनानिमित्त परभणीकरांनी नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तस्वकीयांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांचे आशीर्वाद, लहानग्यांना भेटवस्तू आणि मिठाई-फराळाच्या देवाणघेवाणीतून आपुलकीचा स्नेह अनुभवायला मिळाला. दुसरीकडे फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरही शुभेच्छांचे संदेश, आकर्षक रांगोळ्या, दीपसजावट, कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली. पारंपरिक भेटीगाठी, डिजिटल शुभेच्छांच्या संगमातून परभणीकरांची दिवाळी आनंददायी व संस्मरणीय ठरली. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Ratnagiri MIDC Water Storage 2026 : उद्योगांची पाण्याची चिंता आता मिटणार! 'या' पाच धरणांत मे-जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा; MIDC कडून पाण्याचे चोख नियोजन

Latest Marathi News Live Update: : धाराशिवच्या कौडगाव एमआयडीसीमधील सोलर प्लांटला भीषण आग; लाखो रुपयांच्या सोलर प्लेट्स जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

SCROLL FOR NEXT