छत्रपती संभाजीनगर

लक्ष्मीपूजन उत्साहात; बाजारपेठेत चैतन्याची लाट

CD
लक्ष्मीपूजन उत्साहात; बाजारपेठेत चैतन्याची लाट - खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; फुलांचे भाव वधारल्याने झेंडू उत्पादकांची दिवाळी गोड -- हिंगोली : दीपावलीच्या उत्साहात लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बाजारपेठांना चांगली झळाळी आली. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य, फुले, फळे आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. विशेष म्हणजे, झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. सणानिमित्त झालेल्या खरेदी-विक्रीमुळे व्यापारी, छोटे विक्रेते आणि फेरीवाल्यांनाही चांगला व्यवसाय मिळाला. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक, जवाहर रोड आणि महावीरस्तंभ परिसरात सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. सकाळी आणि दुपारी बारापर्यंत बाजारपेठेत मोठी गर्दी होती. त्यानंतर दुपारी काही काळ गर्दीचा ओघ कमी झाला. मात्र, सायंकाळी चारनंतर पुन्हा बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली. वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. लक्ष्मीपूजनासाठी ऊस, केळीची पाने, आंब्याची पाने, आवळा, झेंडूची फुले, लक्ष्मी व गणेशाच्या प्रतिमा तसेच विविध पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने प्रमुख चौकांमध्ये थाटण्यात आली होती. शनिवारपासूनच विक्रेत्यांनी बाजारपेठेत दुकाने मांडली होती. रविवारी ग्राहकांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांची दिवसभर लगबग पाहायला मिळाली. चौकट प्रतिष्ठानांसह घरोघरी लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाला धार्मिक महत्त्वाबरोबरच व्यावसायिकदृष्ट्याही विशेष स्थान आहे. त्यामुळे घरोघरी पूजेची तयारी सुरू असतानाच दुकाने, कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही सजावट करून महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. धन आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मीच्या पूजनासाठी व्यापाऱ्यांनीही विशेष तयारी केली होती. एकूणच लक्ष्मीपूजनाच्या खरेदीमुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीचे चैतन्य अधिकच खुलले होते. चौकट झेंडू हिंगोलीत ५०, तर औंढ्यात १५० रुपये लक्ष्मीपूजनात झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने फुलांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. हिंगोली शहरात प्रतिकिलो ५० रुपये तर औंढा नागनाथ, जवळा बाजार येथे झेंडूने भावात उच्चांकी गाठत २०० रुपयांचा पल्ला गाठला होता. घरांची सजावट, तोरणे आणि पूजेसाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. फुलांना चांगला भाव मिळाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागला. चौकट बाजारपेठेसह घरोघरी रोषणाईचा झगमगाट दिवाळी सणानिमित्त मागील चार दिवसांपासून बाजारपेठांसह घरोघरी आकाशकंदील, रंगीबेरंगी लायटिंगचा झगमगाट पहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठानासमोर केळीचे खांब, ऊस तसेच इतर साहित्यासह महालक्ष्मीची पूजा केली. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. चौकट पूजेच्या साहित्याचे भाव झेंडू - ५० ते ७० रुपये उसाची जोडी - ६० ते ८० रुपये केळीचे खांब (पाच) - १०० ते १५० रुपये झाडू - ५० ते १०० रुपये ---- प्रतिक्रिया दसऱ्याला झेंडू मातीमोल किमतीत विक्री करावा लागला. दिवाळीत समाधानकारक भावाची आशा होती. त्यानुसार चांगला भाव मिळाला. काही ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपयांवर झेंडू गेल्याची माहिती आहे. हिंगोलीत मात्र एक किलो फुलांसाठी ५० ते ७० रुपये मिळाले. - रामेश्वर कऱ्हाळे, झेंडू उत्पादक शेतकरी ---- प्रतिक्रिया अत्यल्प पावसामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरी दिवाळीचा सण साजरा करणेही महत्वाचे आहे. ग्रामीण भागासह शहरातील नागरिक हा सण उत्साहात साजरा करीत असून, दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. - श्यामकुमार बजाज, किराणा व्यावसायिक

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT