टुडे मेन
---
LTR26B15598 लातूर : येथील विमानतळाची इमारत.
---
विमानतळाच्या विकासाला मिळणार भरारी
----
चार कोटींचा निधी मंजूर, कंन्सल्टंटचीही लवकरच नियुक्ती; सरकारचे लातूरकरांना ‘दिवाळी गिफ्ट’
---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ : अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या लातूर विमानतळाच्या विकासाला आता गती मिळणार आहे. विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने नुकताच ५७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर आता आणखी ४.१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) विकासकामांच्या नियोजनासाठी ‘कंन्सल्टंट’चीही नियुक्ती करण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्या असून, विकासकामांना लवकरच सुरवात होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सरकारकडून लातूरकरांना ‘गिफ्ट’ मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील विविध भागांतील विमानतळांवरील अपुऱ्या सुविधांचा विषय चर्चेला आला. लातूर विमानतळावरही आवश्यक तांत्रिक व भौतिक सुविधाच उपलब्ध नाहीत, याकडे ‘सकाळ’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. या वृत्तमालिकेची लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळावरील सुविधांबाबत बैठक बोलावली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लातूर विमानतळावर सुविधा पुरवण्याची मागणीही केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लातूर विमानतळासाठी ५७ कोटींचा निधी एक जूनला मंजूर केला. त्यानंतर आता संरक्षण भिंत व अन्य विकासकामांसाठी ४.१५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
सरकारने सुरवातीला लातूर विमानतळ हे ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर एका खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिले होते. पण, सरकारच्या अटी-शर्तींचा भंग केल्याने खासगी कंपनीकडील विमानतळ काढून घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार ‘एमआयडीसी’ने विमानतळ आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर ‘एमआयडीसी’कडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लातूर विमानतळ वर्षभरापूर्वी आपल्या ताब्यात घेतले. लातूर विमानतळाच्या विकासासाठी सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी वेगवेगळी विकासकामे हाती घेत आहे. यासाठी कंन्सल्टंटची नियुक्ती करण्याचे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाजमाध्यमातून जाहीर केली. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी विमानतळाला भेटी देऊन विकासकामांची माहिती घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---
१६ वर्षांपासून विमानतळ बंद स्थितीत
लातूर विमानतळावरून २००८ मध्ये विमानाचे पहिले उड्डाण झाले. त्यानंतर २००९ मध्ये हे विमानतळ एका खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आले. पण, त्यांनी वर्षभराच्या आतच येथील विमानसेवा बंद केली. त्यामुळे १६ वर्षांपासून लातूर विमानतळ बंद स्थितीत आहे. पण, राज्य सरकारने या विमानतळाच्या विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर केल्याने येथून लवकरच विमानांचे उड्डाण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
---
विमानतळाची सद्यःस्थिती
विमानतळाची एकूण जागा : ४८ हेक्टर
धावपट्टीची लांबी : १७०० ते २००० मीटर
धावपट्टीची उंची : ६४९ ते ६९४ मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.