LTR30HTP03.jpg समीरसिंह साळवे
लातुरात ३७९ ठिकाणांवरील गस्तीचे होणार निरीक्षण
-
दिवाळीनिमित्त पोलिस यंत्रणा सज्ज; कोंबिंग ऑपरेशन, गुन्हेगारांची तपासणी होणार
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३० ः लातूर शहरात आगामी दिवाळी सण शांततेत, सुरक्षित आणि निर्भय वातावरणात साजरा व्हावा, तसेच सणासुदीच्या काळात होणाऱ्या चोरी, घरफोडी, वाहनचोरी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध घालता यावा, यासाठी लातूर शहर उपविभागीय पोलिस विभागाच्या वतीने व्यापक सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. ई-पोलिस क्यूआर कोड स्कॅनिंग प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ३७९ ठिकाणांवरील पोलिस गस्तीचे निरीक्षण करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विविध भागांतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करणे पोलिसांना शक्य होणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, व्यापारी संकुले, गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक तसेच निवासी परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच अचानक नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि विशेष पोलिस पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई
२०२६ मध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत लातूर शहर उपविभागात गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी विविध कायद्यांनुसार मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कलम १२६ बीएनएसएस अंतर्गत २ हजार ११२, कलम १२८ अंतर्गत १३, कलम १२९ अंतर्गत १४९, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ ते ५७ अंतर्गत ६०, कलम १२२ अंतर्गत ३६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत १५४, एमपीडीए कायद्यांतर्गत १०, तर कलम १६३ बीएनएसएस अंतर्गत १९३ प्रतिबंधात्मक कारवायांचा समावेश आहे. आगामी दिवाळी सणाच्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कोट----
नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेचे संरक्षण आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने व पैशांची विशेष काळजी घ्यावी. सणानिमित्त बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घ्यावी. घराला व्यवस्थित कुलूप लावावे तसेच वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करून लॉक करावीत. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
-समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर
----