लातूर शहरात २४ ऑक्टोबरला
शासकीय योजनांचा महामेळावा
--
लातूर, ता. ५ : शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचावी आणि त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाला शासकीय योजनांचा महामेळावा व महाविधी सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
लातूर शहरातील सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि कायद्यांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे, विविध शासकीय योजनांमध्ये समुदायाचा सहभाग वाढवणे, पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत योजनांचे लाभ पोचवणे तसेच लोकांच्या कायदेशीर समस्या समजून घेऊन त्यांना योग्य सल्ला देणे हा या शिबीराचा मुख्य हेतू आहे. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनामार्फत ४० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या शिबिराच्या पूर्वतयारीचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका आणि जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी नुकताच आढावा घेतला. लातूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रशासनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या महामेळाव्यात प्रामुख्याने श्रमिक मजूर, दिव्यांग व्यक्ती, बालकांशी निगडीत मुद्दे, ट्रान्सजेंडर, कारागृहातील कैदी, अनुसूचित जाती व जमाती, ज्येष्ठ नागरिक, भिकारी व बेघर, रस्ता सुरक्षा व अपघात, नैसर्गिक आपत्तीचे पीडित आणि तस्करीचे पीडित या घटकांशी संबंधित विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे. या शिबिरास मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती तथा लातूर न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते लाभार्थींना योजनांचे वाटप केले जाणार आहे, असे एस.जे. भारुका, डॉ. बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले.
----