स्वाभिमानी मजूर संघटनेचा
लातूर शहरात आज मोर्चा
लातूर, ता. २७ ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मजुरांच्या हाताला नियमित काम देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता. २८) शहरातील पीव्हीआर चौकापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत स्वाभिमानी मजूर संघटनेच्या वतीने काम मागणी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष चंदनकुमार, प्रदेश समन्वयक जीवन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वाभिमानी मजूर संघटना मजुरांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सध्याच्या भीषण दुष्काळाच्या छायेत मजुरांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक मजुराच्या हाताला नियमित काम देण्यात यावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंदनकुमार यांनी सांगितले.
लातूरमधील हा मोर्चा झाल्यानंतर (ता. दोन) धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि (ता. तीन) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अशाच पद्धतीने मोर्चा काढला जाणार आहे. सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व मजूर कुटुंबाना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, रोजगार हमी कामाची मागणी केलेल्या मजुरांना तत्काळ काम उपलब्ध करून द्यावे, कामाची मागणी करून काम मिळालेल्या मजुरांना लवकरात लवकर बेरोजगार भत्ता देण्यात यावा, गरजू मजुरांना जॉब कार्ड काढून देऊन व इ केवायसी तत्काळ करून द्यावी, महिला मजुरांसाठी योग्य काम देण्यात यावे, मनरेगा हाताळणीतील सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये मनरेगा विभागाने सार्वजनिक कामे सुरू करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, रोजगार हमीची मजुरी दिवसाला ६०० रुपये करून आठवड्याला मजुरांच्या खात्यावर पेमेंट जमा करण्यात यावे, अशा मागण्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.