लक्ष्मीच्या पावलांसह कमळाकृती पणत्यांना मागणी
-----
बीडच्या बाजारपेठेत ५० प्रकार; २० रुपयांपासून डिझायनर पणत्या उपलब्ध
-----
बीड, ता. २८ : शहरातील बाजारपेठा दीपोत्सवासाठी सजू लागल्या असून, घराघरांत सजावटीची लगबग सुरू झाली आहे. यंदा पारंपरिक मातीच्या पणत्यांना आधुनिक कलाकुसरीची जोड मिळाली आहे. लक्ष्मीच्या पावलांच्या आकारातील, कमळाकृती आणि विविध नक्षीदार डिझायनर पणत्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे.
दिवाळीत घराची सजावट, अंगणातील रांगोळी आणि दारातील पणत्यांची आरास यांना विशेष महत्त्व असते. हीच गरज लक्षात घेऊन कुंभार आणि कलाकारांनी मातीच्या पणत्यांना आकर्षक आकार व नक्षीकामाची जोड दिली आहे. पारंपरिक समया, बहुस्तरीय दीपमाळा, कमळाच्या पाकळ्यांचे नक्षीकाम आणि लक्ष्मीच्या पदचिन्हांची छाप असलेल्या पणत्यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. रांगोळीच्या बाजूला तसेच देवघरात ठेवण्यासाठी ग्राहकांकडून अशा पणत्यांची खरेदी केली जात आहे.
-----
डिझायनर पणत्यांची क्रेझ
बाजारपेठेत लहान आकारांपासून मोठ्या आकारांपर्यंत ५० हून अधिक प्रकारच्या डिझायनर पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लक्ष्मी पाऊल, कमळाकृती, स्वस्तिक, शुभ-लाभ, कलश दीप, हत्ती पणती, तीन ते पाच थरांच्या दीपमाळा, पारंपरिक समई, तुळशी वृंदावन दीप, ओंकार पणती, मोरपिंखी पणती, कासव दीप, शंख दीप, पंचमुखी आणि सप्तमुखी दिव्यांसह विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.
-----
पणत्यांचे संच ५०० रुपयांपर्यंत
पानांच्या आकारातील पणत्या, रंगोळी कॉर्नर पणत्या, अष्टकोनी नक्षीदार दिवे, झुंबर पणत्या, जाळीदार कटवर्क पणत्या आणि देवघरासाठीच्या आकर्षक दिव्यांनाही मागणी आहे. या पणत्यांचे दर २० रुपयांपासून सुरू होत असून, मोठ्या आकारांच्या आणि विविध प्रकारच्या पणत्यांचे संच ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पारंपरिक मातीच्या वस्तूंना आधुनिक सजावटीची जोड मिळाल्याने ग्राहकांना विविध पर्याय मिळत आहेत.
-----
ग्राहकांचा कल पारंपरिक मातीच्या साहित्याला आधुनिक रूप दिलेल्या डिझायनर वस्तूंकडे वाढत आहे. त्यामुळे यंदा लहानांपासून मोठ्या आकारांपर्यंत विविध आकर्षक पणत्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. सुबक नक्षीकामामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्यांना परवडतील असे दर ठेवल्याने मागणीत वाढ होत आहे.
- संदीप पंडित, विक्रेते
-----
बीड : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत दाखल झालेल्या लक्ष्मीच्या पावलांच्या आणि विविध डिझायनर पणत्या.
ABD26J82219, ABD26J82220